नागरिक गायब, सरपंचही गायब! धरणगावची ग्रामसभा झाली ‘फ्लॉप शो’

धरणगाव : मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे गावाच्या विकासाचे प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा नागरिकांच्या अनुपस्थितीमुळे अखेर रद्द करण्यात आली. मात्र, ग्रामसभा रद्द होण्यापेक्षाही अधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे ग्रामपंचायतीचे सरपंचच ग्रामसभेला गैरहजर!
गावाच्या विकासाचे निर्णय घेण्यासाठी ग्रामसभा हे लोकशाहीचे महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. मात्र, आजच्या ग्रामसभेची परिस्थिती पाहता ‘ग्रामसभा कुणासाठी?’ असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे नागरिकांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली, तर दुसरीकडे गावाच्या कारभाराचे नेतृत्व करणारे सरपंचही उपस्थित राहिले नाहीत.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, विकासकामे, ग्रामपंचायतीचा निधी आणि गावातील विविध समस्यांवर चर्चा करण्याची संधी आज पुन्हा हुकली. नागरिक नसतील तर प्रश्न कोण विचारणार आणि सरपंचच उपस्थित नसतील तर उत्तर कोण देणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमध्ये चर्चिला जात आहे.
ग्रामसभा ही केवळ कागदोपत्री कार्यक्रम दाखवून औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय ग्रामसभा निष्प्रभ ठरत असेल, तर याला जबाबदार कोण? आणि सरपंचांच्या अनुपस्थितीचे कारण काय? याचे स्पष्टीकरण ग्रामपंचायत प्रशासनाने देणे गरजेचे आहे.
गावाच्या विकासासाठी ग्रामसभा महत्त्वाची की फक्त तारीख आणि ठरावापुरती औपचारिकता?
आजची घटना धरणगावच्या ग्रामपंचायत कारभारावर अनेक प्रश्नचिन्हे उभी करून गेली आहे.
आता पुढील ग्रामसभा पुन्हा बोलावली जाणार का? त्याला नागरिक उपस्थित राहणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरपंच यावेळी ग्रामसभेला हजेरी लावणार का? याकडे धरणगावकरांचे लक्ष लागले आहे.



