कोरड्या ढगांनी भिजवले शेतकऱ्याचे डोळेहिवरखेड

(वार्ताहर )यावर्षीचा पावसाळा हा नेत्यांच्या आश्वासना प्रमाणेच हवेत विरत असून या कोरड्या ढगांनी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. हिवरखेड परिसरात तीन आठवड्या पासून पावसाने दीर्घ दडी मारली असून, भुईला भेगा पडून पिके कोमेजून जात असून पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.”नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचे दान रे, फक्त भिजव माझे तहानलेले रान रे “अशी आर्त याचना शेतकरी करत आहेत.हमखास पाण्याचा समजला जाणारा शेवटचा अर्धा आषाढ कोरडा गेल्यानंतर श्रावणाच्या पहिल्या आठवड्याने सुद्धा शेतकऱ्यांना निराश केले आहे. “या मेरिहून त्या मेरिलोक म्या काय काय नोतं पेरलं, बांड बुहाऱ्या वानाचं हे पाणी कुठी उपयलं ” ह्या लोककवी विठ्ठल वाघांच्या ओळी शेतकऱ्यांना आठवत आहेत. यावर्षी अगोदरच अपुरा पाऊस, बोगस बियाणे यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यात खते , फवारणी औषधं, बिजवाई, डवरणी, खुरपणी, मशागतीचा वाढलेला खर्च यामुळे अगोदरच शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून पावसाच्या खंडाने शेतकरी वर्ग धास्तवला आहे. नदी नाल्यांना पूर न आल्यामुळे व जमिनीत मुरणारा पाऊस न झाल्याने उन्हाळ्यात कुपनलिकेचे पाणी पुरणार की नाही ही चिंता बागाईतदार शेतकऱ्याला सतावत आहे. एल निनोच्या या फटक्याचा गंभीर परिणाम शेती व पिकांवर होत असून उत्पादनात हमखास घट होणार आहे निदान या पिकांना योग्य भाव तरी मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.



