शाळा परिसरात जंक फूडला नो एंट्री; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
बुलढाणा:- २२ ऑगस्ट २०२६
बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये व शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्री, जाहिरात व वितरणास बंदी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण आणि निरोगी पिढी घडविण्याच्या उद्देशाने बुलडाणा जिल्ह्यातील शाळांमध्ये तसेच शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूडला बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या निर्देशानुसार शाळा परिसरात जंक फूड पिझ्झा, बर्गर,चिप्स,कोल्ड्रिंकव उच्च चरबी, मीठ आणि साखर असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
शाळांच्या आसपास विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणारे फास्ट फूड, पॅकेज्ड खाद्यपदार्थ आणि आरोग्यास अपायकारक पदार्थ यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराच्या सवयी निर्माण करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या निर्णयानुसार शाळा व शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूड किंवा HFSS (High Fat, Salt and Sugar) खाद्यपदार्थांची विक्री, जंक फूडची जाहिरात व विपणन, जंक फूडच्या विक्रीसाठी मांडणी किंवा प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांना जंक फूडचे मोफत वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी काय खावे?
विद्यार्थ्यांनी फळे व पालेभाज्या, संपूर्ण धान्य व कडधान्ये, दूध व दुग्धजन्य पदार्थ, स्थानिक व पौष्टिक अन्नपदार्थ, सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी तसेच संतुलित व आरोग्यदायी आहाराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही केवळ शाळेची नव्हे तर पालक, शिक्षक, प्रशासन आणि संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. शाळेच्या परिसरात आरोग्यदायी खाद्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पंचायत समिती संग्रामपूरच्या वतीने हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, “जंक फूडला नकार – निरोगी पिढीला आकार!” असा आरोग्यदायी संदेश देण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आहाराच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होणार असून, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
“या उपक्रमासाठी संबंधित शिक्षण विभाग व पंचायत समिती प्रशासनाकडून विशेष पुढाकार घेण्यात आला असून, सारंग कुलकर्णी, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर
माधव पायघन, गटविकास अधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे……..”✍️



