वांग्याचे पीक ग्रोथ प्रमोटरच्या फवारणीनंतर करपले; शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान

मलकापूर : तालुक्यातील हरणखेड येथील शेतकरी सुरेश रमेश चोपडे यांच्या चार एकर शेतातील भरीत वांग्याचे पीक ग्रोथ प्रमोटरच्या फवारणीनंतर करपल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
सुरेश चोपडे यांच्या गट क्रमांक १०६ मधील शिवारातील चार एकर क्षेत्रावर भरीत वांग्याचे पीक घेतले होते. दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी या पिकावर श्रीकर कंपनीचे ‘प्राईम प्रावर’ हे ग्रोथ प्रमोटर औषध फवारण्यात आले. फवारणीनंतर काही वेळातच वांग्याच्या झाडांची पाने वाळू लागली. त्यानंतर झाडे पूर्णपणे करपल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
अचानक झालेल्या या नुकसानीमुळे संपूर्ण वांग्याचे पीक धोक्यात आले असून, उत्पादनासाठी केलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सुरेश रमेश चोपडे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित औषधाची तपासणी करून नेमके नुकसान कशामुळे झाले, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात कृषी विभागाकडून पिकाची पाहणी व औषधाच्या फवारणीसंदर्भातील तांत्रिक तपासणी झाल्यानंतरच पिक करपण्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. संबंधित कंपनीची बाजू तसेच कृषी विभागाचा अहवाल समोर आल्यानंतर प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होईल.
शेतकऱ्याची मागणी : पिकाच्या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामा करण्यात यावा आणि झालेल्या नुकसानीची योग्य ती भरपाई मिळावी.



