श्री गजानन महाराज मंदिरात मूर्ती स्थापना व कळसारोहण सोहळा उत्साहात संपन्न

*हिवरखेड :
हिवरखेड येथील श्री गजानन महाराज मानव सेवा समितीच्या वतीने जुनी चावडी, कामठा येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात मूर्ती स्थापना व कळसारोहण सोहळा २० ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्याच्या निमित्ताने १८ ऑगस्ट रोजी श्री गजानन महाराजांची मूर्ती, शिवलिंग,रामलला दरबार, आसरा माता, तसेच मंदिराचा कळस यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. वारकरी संप्रदाय, महिला भजनी मंडळे, टाळकरी, माळकरी आणि वारकरी बांधव मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
१९ ऑगस्ट रोजी पौरोहित देव महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर यज्ञ, पूजन आणि मूर्ती पूजनाचे धार्मिक विधी पार पडले. यामध्ये सुरेश ओंकारे व सौ. अरुणा ओंकारे, अशोक नाठे व सौ.उज्वला नाठे, महादेव पोके व सौ. पोके,विशाल हागे व सौ.निकिता हागे,महेश शर्मा व सरोज शर्मा, दिलीप नाठे व सौ.नाठे,राहुल नाठे व सौ. नाठे, सुरेश हागे व सौ. हागे, वैभव येलूकार आणि सौ. येलूकार यांनी यजमान म्हणून सहभाग घेतला.
२० ऑगस्ट रोजी श्री गजानन महाराज मूर्ती स्थापना, शिवलिंग,रामलला दरबार, आसरा माता स्थापना तसेच कळसारोहणाचा मुख्य धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
लोकसहभागातून साकारलेल्या या मंदिरामुळे परिसरातील धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळणार असून, श्री गजानन महाराज मानव सेवा समितीच्या या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत आहे.



