बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मृत शेतकरी व बोटांचे ठसे न उमटणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष कार्यपद्धती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी ;शंकर शिवरकर

देऊळगाव राजा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. मात्र, मृत शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करता येत नसल्याने तसेच काही लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे आधार प्रमाणीकरणावेळी उमटत नसल्याने अशा प्रकरणांसाठी शासनाने विशेष कार्यपद्धती (SOP) निश्चित केली आहे.

मृत लाभार्थ्यांसाठी अशी राहील प्रक्रिया : मृत लाभार्थ्याच्या वारसाने संबंधित बँकेकडे मृत्यूचे प्रमाणपत्र व वारसाची नोंद असलेली माहिती सादर करावी. बँकेने कर्जखात्यात मृत शेतकऱ्याच्या वारसाची नोंद केल्यानंतर योजनेच्या पोर्टलवरील ‘Upload Deceased Accounts’ सुविधेद्वारे वारसाची माहिती अपलोड करावी. त्यानंतर बँकेमार्फत अपलोड करण्यात आलेल्या कर्जखात्यांची माहिती महाआयटीकडून योजनेच्या निकषांनुसार संसाधित केली जाईल.

योजनेच्या निकषांनुसार प्रत्येक वारसाने आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. तसेच आधार प्रमाणीकरणापूर्वी अथवा त्यावेळी संबंधित लाभार्थ्यांकडे Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) असणे आवश्यक आहे. मृत कर्जदारास एकापेक्षा अधिक वारस असल्यास योजनेच्या निकषांनुसार कर्जाच्या रकमेतील वारसांचा हिस्सा निश्चित करून त्यानुसार कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात येईल. वारस अपात्र असल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

बोटांचे ठसे उमटत नसलेल्या लाभार्थ्यांसाठी पर्याय : शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या यादीतील विशिष्ट क्रमांक, आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन भेट द्यावी. यादीतील विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांकाद्वारे पोर्टलवर कर्जखात्याची माहिती पाहता येईल. त्यानंतर मान्य अथवा अमान्य पर्यायाची नोंद करून बोटांच्या ठशांची नोंद घेण्यात येईल.
आधार प्रमाणीकरण करताना एका बोटाचा ठसा उमटत नसल्यास वेगवेगळ्या बोटांचे किमान तीन वेळा प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न करावा. तीनही प्रयत्नांनंतरही प्रमाणीकरण होत नसल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ हा पर्याय आपले सरकार केंद्र चालकाने वापरावा. त्यानंतर केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाद्वारे आधार प्रमाणीकरण करावे.

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तक्रार तालुकास्तरीय समितीकडे (TLC) पोर्टलद्वारे पाठविण्यात येईल. संबंधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन आधारकार्ड, बँकेचे पासबुक, ७/१२ उतारा आदी कागदपत्रांच्या आधारे आपली ओळख निश्चित करून घ्यावी. तालुकास्तरीय समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित केली जाईल. त्यानंतर आधार क्रमांक तोच असल्यास संबंधिताची तक्रार मान्य करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

या विशेष कार्यपद्धतीमुळे मृत शेतकरी तसेच बोटांचे ठसे न उमटणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button