पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :-सागर रावण चोरे
शेगाव , दि. १९ हिवरखेड सोनाळा मार्गावरील
कार्ला फाट्याजवळ बुधवारी सायंकाळी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दैनिक ‘देशोन्नती’चे पत्रकार किशोर खडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी रुपाली खडे यांच्यासह संतोष अंदुरकर हेही जखमी झाले आहेत. सोनाळा (ता. संग्रामपूर) येथील रहिवासी पत्रकार किशोर खडे हे पत्नी रुपाली यांच्यासह दुचाकीने प्रवास करीत होते. कार्ला फाट्याजवळ
समोरून येणाऱ्या स्कूटीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात किशोर खडे आणि रुपाली खडे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमींना तातडीने मदत केली. किशोर खडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पत्रकार किशोर खडे यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, सहकारी पत्रकार, मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.



