अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील ९,५२९ शेतकरी पात्र

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा/सिंदखेडराजा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २०२६ मधील योजनेसाठी सहाय्यक निबंधक कार्यालय, सिंदखेडराजा यांना प्राप्त झालेल्या यादीत तालुक्यातील ९ हजार ५२९ शेतकरी पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित यादी कार्यालयास प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पात्र ९ हजार ५२९ शेतकऱ्यांपैकी ७ हजार ७०२ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे, तर १ हजार ८२७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. त्यामुळे उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.
दरम्यान, आधार प्रमाणीकरण व ई-केवायसीसंदर्भात सहाय्यक निबंधक कार्यालय, सिंदखेडराजा येथे १२३ ऑफलाइन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या निराकरणाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच ऑनलाइन माध्यमातून १४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी १३ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी करताना अडचणी येत असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून तक्रारी नोंदविता येणार आहेत. योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होणे महत्त्वाचे असल्याने उर्वरित १ हजार ८२७ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



