बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अंढेरा नदीपात्रातील खोलीकरणाच्या कामाची चौकशी करा गजानन तेजनकर यांची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगावराजा : अंढेरा गावाच्या पूर्वेकडील नदीपात्रात सुरू असलेल्या रुंदीकरण, खोलीकरण व गाळ काढण्याच्या कामाची तातडीने स्थळ पाहणी करून सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अंढेरा येथील गजानन नारायण तेजनकर यांनी तहसीलदार, देऊळगाव राजा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नदीपात्रातील हे काम कोणत्या शासकीय विभागामार्फत, कोणत्या योजना अथवा कार्यक्रमांतर्गत आणि कोणत्या निधीतून सुरू करण्यात आले आहे, याबाबत स्थानिक नागरिकांना स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’, ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’, ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ किंवा अन्य कोणत्या शासकीय योजनेतून हे काम सुरू आहे, याची अधिकृत अभिलेखांच्या आधारे पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कामाबाबत संबंधित कंत्राटदाराकडे माहिती विचारली असता अपेक्षित माहिती मिळत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे कामाच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक निधीचा अपव्यय होणार नाही, यासाठी कामाची गुणवत्ता, प्रत्यक्ष खर्च आणि मंजूर निकषांची काटेकोर तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर कामासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, अंदाजपत्रक, कार्यादेश तसेच मंजूर आराखडा आहे का, असल्यास त्यांचे क्रमांक व दिनांक तपासावेत, अशी मागणी आहे. काम कोणत्या विभागाच्या देखरेखीखाली सुरू आहे आणि संबंधित अधिकारी कोण आहेत, याची माहितीही स्पष्ट करण्यात यावी, माहिती मिळत नसल्याने संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.

अवजड यंत्रसामग्रीद्वारे सुरू असलेल्या कामाची मंजूर आराखड्याशी तुलना करून नदीपात्राची प्रत्यक्ष रुंदी व खोली, काढण्यात आलेल्या गाळाचे प्रमाण तसेच गाळाची वाहतूक, साठवणूक अथवा विल्हेवाट याबाबत तांत्रिक मोजमाप व पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नदीकाठावरील वृक्षांचे नुकसान अथवा वृक्षतोड झाली आहे का, याचीही संबंधित सक्षम विभागामार्फत तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अंदाजपत्रकानुसार काम झाले नसल्याचे किंवा मंजूर आराखड्यापेक्षा प्रत्यक्ष कामात तफावत असल्याचे आढळल्यास त्याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यापूर्वीही संबंधित कंत्राटदाराच्या कामाबाबत तक्रारी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे असल्याने, त्या तक्रारींचीही नोंद व चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकशीत कामासाठी आवश्यक मंजुरी नसल्याचे, मंजूर आराखड्यानुसार काम होत नसल्याचे, निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे किंवा अन्य नियमभंग आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्ती, संस्था, कंत्राटदार किंवा यंत्रधारकाविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करावी. दोष सिद्ध झाल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याबाबतही नियमानुसार निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी तक्रारदार यांची मागणी आहे.

दरम्यान, नदीपात्रातील कामाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

सदर काम कोणत्या योजनेतून सुरू आहे, कोणत्या विभागाच्या अखत्यारित आहे, कोणत्या मंजुरी देण्यात आल्या आहेत आणि प्रत्यक्ष काम मंजूर निकषांनुसार होत आहे का, याबाबतचा चौकशी अहवाल लेखी स्वरूपात देण्यात यावा, अशी मागणी निवेदनत करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button