आधार केंद्रातील नागरिकांची फरफट थांबणार कधी? नगरसेविका सलमाबी मणियार यांचे पोस्टमास्तर व तहसीलदारांना निवेदन

आधार नोंदणीतील तांत्रिक अडचणींनी नागरिक त्रस्त; स्वतंत्र खिडकी व निश्चित वेळेची नगरसेविकांची मागणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर येथील आधार नोंदणी केंद्रात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत नगरसेविका सलमाबी शेख मुशीर मणियार यांनी पोस्टमास्तर आणि तहसीलदार यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आधार नोंदणी व अद्ययावतीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना सातत्याने तांत्रिक अडचणी, कर्मचाऱ्यांची अनुपलब्धता आणि वेळेअभावी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आधार नोंदणी केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी होत असून अनेकांना संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे. तांत्रिक अडचणींचे कारण देत कामे रखडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका सलमाबी मणियार यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्याची नियमित नियुक्ती करणे अथवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे, आधार नोंदणी व अद्ययावत कामकाजासाठी निश्चित दिवस आणि वेळ जाहीर करून सूचना फलक लावणे तसेच नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नागरिकांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा आणि आधार केंद्रातील गैरसोयी दूर करून सेवा अधिक प्रभावी करावी, अशी अपेक्षाही नगरसेविका सलमाबी मणियार यांनी व्यक्त केली आहे.
आधार कार्ड हे आज प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन व्यवहाराशी निगडित महत्त्वाचे ओळखपत्र आहे. अशा परिस्थितीत नोंदणी आणि अद्ययावत प्रक्रियेत होणारा विलंब सर्वसामान्यांसाठी मोठी अडचण ठरतो. प्रशासनाने नागरिकांच्या वेळेचा आणि सुविधांचा विचार करून सक्षम मनुष्यबळ, स्पष्ट वेळापत्रक आणि पारदर्शक कार्यपद्धतीची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे.



