ट्रान्सफॉर्मर दुर्घटनेनंतर महावितरणची संशयास्पद शांतता? नियम धाब्यावर, जबाबदार कोण?

मुक्ताईनगर | प्रतिनिधी
भाग -2
चांगदेव येथे अवजड आयशर वाहनाच्या धडकेत विद्युत ट्रान्सफॉर्मरची संपूर्ण संरचना कोसळून सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा समोर आला आहे. मात्र, या गंभीर घटनेनंतर महावितरणने नेमकी कोणती कारवाई केली, पोलिसांत गुन्हा दाखल झाला का, पंचनामा झाला का, नुकसानभरपाईची वसुली झाली का आणि दुरुस्तीचा खर्च कुणाच्या खिशातून झाला, याबाबत अधिकृत मौन पाळले जात असल्याचा आरोप होत आहे. परिणामी महावितरणच्या कार्यपद्धतीवर संशयाचे गडद सावट निर्माण झाले असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, MH-19 CT-9946 क्रमांकाच्या आयशर वाहनाने ट्रान्सफॉर्मरच्या संरचनेला जोरदार धडक दिल्याने संपूर्ण यंत्रणा जमीनदोस्त झाली. अशा प्रकारच्या अपघातात महावितरणच्या नियमांनुसार तातडीने पोलिसांत तक्रार, पंचनामा, नुकसानीचे मूल्यांकन आणि संबंधित वाहनमालकाकडून नुकसानभरपाईची वसुली अपेक्षित असते. मात्र, या सर्व प्रक्रिया प्रत्यक्षात झाल्या की नाहीत, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.दरम्यान, स्थानिक पातळीवर संबंधित वाहनमालकाकडून काही रक्कम घेऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न झाला आणि ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती मात्र महावितरणच्या शासकीय निधीतून करण्यात आल्याची चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी या चर्चेमुळे संपूर्ण व्यवहाराच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या संदर्भात मुक्ताईनगरचे कार्यकारी अभियंता शिवाजीराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, “मला याबाबत कोणतीही माहिती नाही,” असे त्यांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, त्याचवेळी संबंधित ठेकेदार त्यांच्या दालनात उपस्थित असल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून मिळाल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहिती व भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.तसेच उपअभियंता शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता, “माझ्याकडे अद्याप कोणतीही माहिती नाही. फोटो किंवा व्हिडिओ पाठवा, मी संबंधित ठेकेदाराला विचारतो. अधिक माहितीसाठी माझ्या वरिष्ठांशी संपर्क साधा,” असे उत्तर मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. अपघाताला आठवडाभराहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही जबाबदार अधिकाऱ्यांकडे स्पष्ट माहिती नसल्याचा दावा होत असल्याने महावितरणच्या प्रशासकीय समन्वयावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.स्थानिक नागरिकांच्या मते, अपघाताच्या वेळी ट्रान्सफॉर्मर परिसरात शेतकरी किंवा शेतमजूर काम करत असता, मोठी जीवितहानी होऊ शकली असती. त्यामुळे हा केवळ सरकारी मालमत्तेच्या नुकसानीचा विषय नसून नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.यापूर्वीही चांगदेव परिसरात आवश्यक परवानग्या न घेता वीजवाहिन्या स्थलांतरित केल्याचे आरोप झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर शहरातील गजानन महाराज परिसरात विद्युत खांबावर काम करताना एका मजुराला विजेचा धक्का बसून तो खाली पडल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातही संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होती. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणात पंचनामा झाला का, पोलिस तक्रार दाखल झाली का, नुकसानभरपाईची वसुली करण्यात आली का, दुरुस्तीचा खर्च नेमका कुणी केला आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांची भूमिका काय होती, याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून संपूर्ण अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार अथवा संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, सरकारी मालमत्तेच्या नुकसानीचे खरे उत्तरदायित्व निश्चित होणार की हे प्रकरणही फाईलमध्येच दडपले जाणार? या प्रश्नाचे उत्तर महावितरणच्या पुढील भूमिकेतूनच स्पष्ट होणार आहे.



