महाविद्यालयीन शुल्कापेक्षा राहणीमानाचा खर्च जड; उच्च शिक्षणासाठी पालकांचे आर्थिक गणित बिघडले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी: गजानन तांगडे खामगाव
खामगाव | प्रतिनिधी : गजानन तांगडे
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर आणि मोताळा तालुक्यातील हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांकडे दरवर्षी धाव घेतात. मात्र महाविद्यालयीन शुल्कापेक्षा विद्यार्थ्यांच्या राहणीमानाचा खर्च अधिक असल्याने पालकांच्या आर्थिक बजेटवर मोठा ताण निर्माण होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.उच्च शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह, पेइंग गेस्ट (PG), मेस, प्रवास, अभ्यासिका, इंटरनेट, मोबाईल, स्टेशनरी तसेच इतर दैनंदिन गरजांसाठी दरमहा मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे. त्यामुळे शिक्षणाचा एकूण खर्च केवळ प्रवेश शुल्कापुरता मर्यादित न राहता राहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत होत आहे.मोठ्या शहरांमध्ये भाड्याच्या खोल्यांचे दर सातत्याने वाढत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना मर्यादित जागेत एकत्र राहण्याचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. खर्च कमी करण्यासाठी दोन ते चार विद्यार्थी एकाच खोलीत वास्तव्यास असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. याशिवाय डिपॉझिट, वीज, पाणी आणि इतर सुविधांसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जात असल्याने पालकांवरील आर्थिक भार आणखी वाढत आहे.महागाईच्या पार्श्वभूमीवर वाढलेला राहणीमानाचा खर्च अनेक मध्यमवर्गीय आणि शेतकरी कुटुंबांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी पालक अतिरिक्त आर्थिक कसरत करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी परवडणारी वसतिगृहे, सवलतीच्या मेस सुविधा आणि शैक्षणिक सहाय्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



