बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

२४ तासांच्या मुसळधार पावसाने बुलढाणा हादरला; ९१ महसूल मंडळांत अतिवृष्टी, प्रशासन युद्धपातळीवर

बुलढाणा | प्रतिनिधी

रतन भगत संग्रामपूर

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून ९२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९१ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला असून जळगाव जामोदमध्ये अवघ्या २० तासांत २५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांमध्ये तसेच घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अन्नधान्य, कपडे आणि घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील इलोरा गाव मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेल्याचे चित्र असून, अनेक ठिकाणी वाहतूक व दळणवळण विस्कळीत झाले आहे.दरम्यान, शेगाव येथे घराची भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.सततच्या पावसामुळे उभी पिके पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी नव्याने उगवलेली पिके वाहून गेली आहेत. काही भागांत सुपीक जमीन खरडून गेल्याने शेतांचे नदीपात्र किंवा तलावासारखे स्वरूप झाल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वीज खांब व तारा कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच मोबाईल नेटवर्क ठप्प झाल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे.पूरस्थितीची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. बाधित भागातील पंचनामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले.पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनीही जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे सांगितले. बाधित नागरिकांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.प्रशासनाने नुकसानग्रस्त शेती, घरे आणि इतर मालमत्तेचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.तालुकानिहाय पावसाची नोंद (मिमी): बुलढाणा – १०५, चिखली – ११०, देऊळगाव राजा – ८३, सिंदखेडराजा – ९८, लोणार – १००, मेहकर – १११, खामगाव – १५२, शेगाव – १४०, मलकापूर – १३१, मोताळा – १०७, संग्रामपूर – ११८, तर जळगाव जामोदमध्ये सर्वाधिक २५५ मिमी पावसाची नोंद झाली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button