तुळजापूरच्या अनुष्का कांबळेचे स्कॉलरशिप परीक्षेत दैदीप्यमान यश; खडतर परिस्थितीत सिंगल मदर वंदना कांबळे यांच्या कष्टाचे चीज!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी; शंकर शिवरकर
तुळजापूर:जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते, हे तुळजापूर येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का राजीव कांबळे हिने दाखवून दिले आहे. नुकत्याच झालेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेत अनुष्काने ८२.६६% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाने परिसरात तिचे कौतुक होत असून, एका संघर्षमय माऊलीच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले आहे.
आईचा अहोरात्र संघर्ष अन् शिवणकामाची साथअनुष्काच्या या यशामागे तिची आई सौ. वंदना राजीव कांबळे यांचा अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी प्रवास आहे. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत वंदना कांबळे या ‘CMRC महिला बचत गट’ येथे ‘सीआरपी’ (CRP) म्हणून कार्यरत आहेत. ऑफिसची जबाबदारी चोख सांभाळून, त्या घरात आर्थिक हातभार लावण्यासाठी रात्री घरी आल्यावर शिवणकामही करतात. पतीच्या पश्चात वडिलांचे आणि आईचे अशी दोन्ही कर्तव्ये त्या एकटीनेच पार पाडत आहेत.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही.कष्टाची जाणीव आणि डोळ्यांतील आनंदाश्रूआई दिवस-रात्र करत असलेल्या कष्टाची पूर्ण जाणीव अनुष्काला होती. म्हणूनच तिने अभ्यासात आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले. जेव्हा स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल लागला आणि अनुष्काला ८२.६६% गुण मिळाल्याचे समजले, तेव्हा वंदना यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. आपल्या मुलीचे यश पाहून त्यांनी अनुष्काला घट्ट जवळ घेत मनापासून आशीर्वाद दिला.
“बाळा, तुझ्या चांगल्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही,” असा विश्वास त्यांनी या वेळी बोलून दाखवला. एका सिंगल मदरचा हा संघर्ष आणि मुलीने दिलेली ही यशाची पावती आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



