24 तासांत खुनाचा गुन्हा उघड; रावेर पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद

अनैतिक संबंधांच्या संशयातून खुनाची घटना; तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अटकेत
रावेर | प्रतिनिधी विकास आमोदकर
रावेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खून प्रकरणाचा अवघ्या 24 तासांत छडा लावत रावेर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि वेगवान कारवाईच्या बळावर ही यशस्वी कामगिरी करण्यात आली.
या प्रकरणात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 343/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1) व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेख सलमान शेख शब्बीर (रा. ऐनपूर, ता. रावेर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मोठा भाऊ शेख कुर्बान शेख शब्बीर (वय 30) याचा खून झाल्याचे उघड झाले.
तपासादरम्यान मयताच्या पत्नीशी आरोपी गणेश उर्फ संजय घोरपडे याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय समोर आला. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. या रागातून आरोपी गणेश घोरपडे व त्याचा साथीदार मेघराज सांगळे यांनी कट रचून मयताचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी तांत्रिक पुरावे, गुप्त माहिती आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने दोन्ही संशयितांचा अवघ्या 24 तासांत शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 17 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व रावेर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.



