चिखली उपजिल्हा रुग्णालयातील कथित अनागोंदी उघड; सामाजिक कार्यकर्त्यांची पाहणी, चौकशी व कारवाईची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली प्रतिनिधी:- सलमान पठाण
चिखली,उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छता, डॉक्टरांची अनुपस्थिती, रुग्णांची गैरसोय आणि आरोग्यसेवेतील कथित त्रुटींविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. ६ जुलै) रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी अनेक रुग्णांनी विविध तक्रारी मांडल्याचा दावा करण्यात आला.
पाहणीदरम्यान रुग्णालय परिसरात अस्वच्छता असल्याचे, ओपीडीमध्ये मर्यादित डॉक्टर कार्यरत असल्याचे तसेच अनेक रुग्णांना डॉक्टरांच्या प्रतीक्षेत थांबावे लागत असल्याचे निदर्शनास आल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. काही रुग्णांनी सर्वसाधारणपणे प्रत्येक आजारावर एकाच प्रकारची औषधे दिली जात असल्याची तक्रार केल्याचा दावाही करण्यात आला.
प्रसूती विभागात अस्वच्छता, माशांचा त्रास, रक्ताने माखलेल्या बेडशीट्स तसेच सुरू असलेल्या बांधकामामुळे महिला व पुरुष रुग्णांना एकाच विभागात ठेवण्यात आल्याने गोपनीयतेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. नवमातांना अशा परिस्थितीत बाळाला स्तनपान करणे कठीण जात असल्याची भावना काही महिलांनी व्यक्त केल्याचेही त्यांनी नमूद केले.
रुग्णांना वेळेवर नाश्ता व जेवण मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली. तसेच सोनोग्राफी विभागात डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयात चौकशी कक्ष किंवा मार्गदर्शनासाठी कर्मचारी नसल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना विविध विभाग शोधण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिल्याचे सांगितले. तसेच रुग्णालयाचे अधीक्षक उपस्थित नसल्याचा आणि त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचा दावा करण्यात आला.
या सर्व कथित प्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि रुग्णालयातील आरोग्यसेवा तातडीने सुधारावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांना प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणीवेळी शेख हारून, सय्यद इम्रान, शेख शकील, गौरव घेवंदे, शेख शन्नाभाई, समीर शेख तसेच जयाताई आराख उपस्थित होते.



