जळगाव कचरा व्यवस्थापन: आमदार खडसेंच्या प्रश्नावर शासनाची सविस्तर कार्यवाही; कंत्राटदार कंपनीवर ५८ लाखांचा दंड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
जळगाव शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नावर उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. जळगाव शहरात कचऱ्याचे वर्गीकरण न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि कचरा व्यवस्थापन होत नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा प्रश्न आमदार खडसे यांनी उपस्थित केला होता.
यावर उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, जळगाव शहरातील कचरा संकलनाचे काम ‘बी.व्ही.जी. इंडिया लि., पुणे’ या कंपनीमार्फत १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आले असून, महानगरपालिका हद्दीतील सर्व आस्थापनांमधून कचरा गोळा करण्यासाठी ८४ घंटागाड्या, ५१ कॉम्पॅक्टर, ५४ मिनी कॉम्पॅक्टर, १६ टिप्पर, २ टाटा पिकअप, ३ स्किप लोडर आणि ४ ट्रॅक्टर यांसारख्या साधनांसह ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र पर्यवेक्षक असून, जी.पी.एस. सॉफ्टवेअरद्वारे त्यांच्या उपस्थितीचे आणि वाहनांचे ट्रॅकिंग केले जाते.
कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत १८.०६ कोटी रुपयांच्या प्रकल्पास १ एप्रिल २०२५ रोजी शासनाने मंजुरी दिली असून, याचे काम ‘रॉयल वेस्टर्न प्रोजेक्ट्स लि., पुणे’ यांना देण्यात आले आहे. कचरा संकलनाच्या कामात अनियमितता आढळून आल्याने आणि करारातील अटी-शर्तींचा भंग केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदार ‘बी.व्ही.जी. इंडिया लि.’ या कंपनीवर ३० मे २०२६ पर्यंत ५८ लाख ३,५०० रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, सदर दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली.



