वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन; डिझेल-पेट्रोल, गॅस सिलेंडर टंचाई व NEET परीक्षेतील गैरप्रकारांवर कारवाईची मागणी….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- शारदा संजय पवार चिखली
चिखली:- ९ जून २०२६
वंचित बहुजन आघाडी चिखली तालुका व शहराच्या वतीने विविध जनहिताच्या प्रश्नांवर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. डिझेल-पेट्रोल टंचाई, गॅस सिलेंडर वितरणातील अडचणी तसेच NEET परीक्षेतील कथित गैरप्रकार यांसारख्या गंभीर विषयांकडे शासनाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डिझेल व पेट्रोलच्या उपलब्धतेवर परिणाम झाल्यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शेतीची कामे सुरू असताना इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून शासनाने तातडीने यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गॅस सिलेंडर वितरणात होत असलेला विलंब, वाढते दर आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबतही निवेदनातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सर्वसामान्य कुटुंबांना याचा मोठा फटका बसत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले. याशिवाय नुकत्याच झालेल्या NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. परीक्षेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या निवेदनावेळी तालुकाध्यक्ष संजय धुरंधर, उपाध्यक्ष संजय जाधव, प्रा. प्रवीण भाऊ खरात, ज्येष्ठ नेते अंबादास जाधव, विनोद भाऊ कळसकर, सुमेध भाऊ जाधव, संजय वानखेडे, दिलीप इंगळे, राजेश बोर्डे, अँड. विजय वानखेडे, ज्येष्ठ नेते लिंबाजी आडे, मनोज भाऊ साळवे, डॉ. संतोष मोरे, रतन साळवे तसेच वंचित बहुजन आघाडीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी चे आक्रमक प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी चिखली येथे विविध जनहिताच्या प्रश्नांबाबत तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते…..✍️



