भुसावळ रेल्वे मंडळातील विकासकामांचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा

भुसावळ रेल्वे मंडळातील विकासकामांचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा
रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश; डीआरएम कार्यालयात आढावा बैठक संपन
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा तसेच प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी भुसावळ मंडळाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) श्री. पुनित अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातील विविध रेल्वे स्थानकांवर सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच भुसावळ रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासह प्रवासी सुविधा वाढविण्यासंदर्भातील कामांच्या प्रगतीची माहितीही घेण्यात आली. याशिवाय “पाचोरा–जामनेर” पीजे रेल्वे विस्तारीकरण प्रकल्प तसेच “भुसावळ ते खंडवा” तिसरी व चौथी रेल्वे मार्ग उभारणीसाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेवरही सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा, मलकापूर, बोदवड, वरंगाव, निंभोरा, सावदा आणि रावेर या प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. स्थानकांवरील मूलभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करण्यावर विशेष भर देण्यात आला.
दरम्यान, विविध रेल्वे प्रकल्पांमुळे शेतजमिनी बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या समस्या आणि अडचणी बैठकीत मांडल्या. या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने योग्य तो पाठपुरावा करून प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे निर्देश दिले.
रेल्वे विकासकामांना गती देतानाच प्रवाशांच्या सुविधा आणि प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करावे, असेही यावेळी खडसे यांनी स्पष्ट केले.
— प्रतिनिधी
भुसावळ



