बुलढाणा रोड रक्तरंजित; दुचाकी-कारच्या जोरदार धडकेत एक ठार, सहकारी गंभीर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
चिखली |.
बुलढाणा रोडवरील दांडगे पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात HDFC बँकेत कार्यरत असलेल्या एका तरुण अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिखली शहरासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.प्राप्त माहितीनुसार, अक्षय कुलसुंदर आणि गोलू गवारे हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच-२८ बीएक्स-२७८६ वरून बुलढाण्याकडून चिखलीकडे येत होते. दरम्यान, दांडगे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीची वॅगनार कार क्रमांक एमएच-४९ बीबी-६३४६ सोबत समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकीचे मोठे नुकसान झाले आणि तिचे सुटे भाग रस्त्यावर विखुरले गेले.या भीषण अपघातात अक्षय कुलसुंदर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गोलू गवारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील जे. जे. प्लस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोघेही चिखली शहरातील राऊतवाडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रवाना केले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.अक्षय कुलसुंदर यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला. शहरात दिवसभर या अपघाताची चर्चा सुरू होती.गेल्या काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि सुरक्षित वाहनचालना करणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



