खानदेशगुन्हेगारीमहाराष्ट्र

रावेर तालुक्यात खुलेआम लाकूड वाहतूक; वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता. प्रतिनिधी – विनोद तायडे

रावेर तालुक्यात दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात लाकडाची खुलेआम वाहतूक होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या प्रकारामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

माहितीनुसार, तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडांची अवैधरित्या कत्तल करून लाकूड ट्रक व इतर वाहनांद्वारे उघडपणे वाहून नेले जात आहे. विशेषतः लिंबाच्या झाडांची बेकायदेशीर तोड होत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या व कागदपत्रे आहेत की नाहीत, याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने संशय अधिकच बळावत आहे.

वन कायद्यानुसार कोणत्याही प्रकारची लाकूडतोड व वाहतूक करण्यासाठी शासनाची परवानगी आणि आवश्यक कागदपत्रे बाळगणे बंधनकारक आहे. तरीही प्रत्यक्षात नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसत असून, रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात लाकडाने भरलेल्या गाड्या मध्यप्रदेशाच्या दिशेने जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली ही वाहतूक रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांच्या मते, संबंधित अधिकारी जाणूनबुजून डोळेझाक करत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

आता या अवैध लाकूड वाहतुकीवर प्रशासन आळा घालणार का, संबंधितांवर कारवाई होणार का, आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार का, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button