घरकुल लाभार्थ्यांसाठी ‘प्रहार’ आक्रमक; २ एप्रिलपासून उपोषणाचा इशारा

ता.बोदवड (प्रतिनिधी ) बोदवड तालुक्यात घरकुल योजनांचा निधी वेळेत न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे अर्धवट अवस्थेत पडून असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर याचा मोठा परिणाम होत असून, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक झाली असून प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या मुदतीत घरकुलाचा दुसरा हप्ता तसेच थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास, येत्या २ एप्रिलपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
तालुक्यात मोदी आवास, शबरी आणि रमाई घरकुल योजनांअंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी घरबांधणीची कामे सुरू केली आहेत. काहींनी जिओ-टॅगिंग प्रक्रियाही पूर्ण केली असली, तरी निधीअभावी ही कामे सध्या ठप्प झाली आहेत. परिणामी लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन निधी वितरित करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या वेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष रमेश लोहार, उपाध्यक्ष बाळू पाटील, सचिव पारसमल डॉक्टर, उपसचिव बजरंग बैरागी, आबाराव देशमुख, अशोक तायडे, भगवान सूर्यवंशी, भास्कर राऊत, गणेश सप्तोल, शरद सावळे, खुशबू शर्मा, चित्रलेखाबाई सपकाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.



