नेकनापूर-फाटा रस्त्याची ‘चाळणी’ प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात उज्वल पाटील चोपडे आक्रमकबेमुदत आंदोलनाचा दिला इशारा,पाच वर्षांतच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचे धिंडवडे….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपुर दि. १० मार्च २०२६
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या नेकनापूर ते नेकनापूर फाटा या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली असून, संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्ता पूर्ण होऊन जेमतेम पाच वर्षे उलटत नाहीत, तोच या मार्गाची अक्षरशः चाळणी झाली आहे. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधूनही दुरुस्ती होत नसल्याने, स्वराज्य पक्षाचे नेते उज्वल पाटील चोपडे यांनी आता प्रशासनाविरुद्ध शड्डू ठोकला असून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल
नेकनापूर फाटा हा मार्ग या भागातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, रस्त्यावर पडलेले प्रचंड मोठे खड्डे आणि दुतर्फा वाढलेल्या झाडाझुडपांमुळे वाहनधारकांना रस्ता शोधताना कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सायकल किंवा बस या खड्ड्यांमुळे वेळेवर पोहोचू शकत नाही, परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला दवाखान्यात नेणेही जिकिरीचे झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे,
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी संबंधित कार्यालयात लेखी निवेदने आणि विनंत्या करण्यात आल्या. परंतु, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्ष काम मात्र शून्य आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच पाच वर्षांत रस्त्याची ही अवस्था झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
“प्रशासनाने जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये. जर या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती सुरू केली नाही, तर आम्हाला लोकशाही मार्गाने संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसावे लागेल,” असा सज्जड दम महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उज्वल पाटील चोपडे यांनी दिला आहे. सध्या रस्ता वापरायोग्य नसल्याने त्रस्त ग्रामस्थ पर्यायी मार्गाचा शोध घेत आहेत. आता या इशाऱ्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का, याकडे संपूर्ण नेकनापूर परिसराचे लक्ष लागले आहे….



