सावदा मंडळातील केळी उत्पादकांना ११.०७ कोटींची पीक विमा भरपाई मंजूर; आ एकनाथराव खडसे यांच्या तारांकित प्रश्नाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे उत्तर

मुक्ताईनगर – सावदा मंडळातील सन २०२४-२५ च्या आंबिया बहार फळपीक विमा योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच विम्याची रक्कम जमा होणार असल्याचची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषद सभागृहात आ. एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली
यावेळी आ. एकनाथराव खडसे म्हणाले रावेर तालुक्यातील सावदा मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२४ मध्ये काढलेल्या
हवामान आधारित फळ पीक विम्याची रक्कम नियमानुसार दिनांक १५ सप्टेंबर, २०२५ पर्यंत त्यांच्या
खात्यात जमा होणे अपेक्षित असताना सावदा मंडळातील शेतकऱ्यांना सदर विम्याची रक्कम मिळाली
नसल्याची बाब दिनांक १३ डिसेंबर, २०२५ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे तरी
नुकसानभरपाई मंजूर करून संबंधित विमा कंपन्यांवर जबाबदारी निश्चित
करण्याबाबत व सावदा, उदळी, तांदलवाडी यासह परिसरातील बाधित शेतकऱ्यांना व्याजासह विमा
भरपाई मिळवून देण्यासंदर्भात शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
यासंबंधी माहिती देऊन तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा नुकसान भरपाई जमा करण्यात यावी अशी आग्रही मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली
सदर तारांकित प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत आंबिया बहार सन
२०२४-२५ मध्ये सावदा महसूल मंडळातील १६२२ नुकसान पात्र शेतकऱ्यांना रक्कम रुपये
११,०७,२६२७८/- कोटी इतकी नुकसान भरपाई निश्चित झाली आहे.
विमा रक्कमेच्या विलंबाबाबत बोलताना मंत्र्यांनी स्पष्ट केले की, भारतीय कृषी विमा कंपनीकडून (AIC) या निधीची मागणी नोव्हेंबर २०२५ च्या अखेरीस प्राप्त झाली आहे. त्यानुसार, राज्य शासनाकडून सदर निधी वितरीत करण्याची तांत्रिक कार्यवाही सध्या सुरू आहे. त्यामुळे लवकरच ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.
असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले .
आमदार एकनाथराव खडसे यांनी सावदा, उदळी आणि तांदलवाडी परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित विम्याकडे तारांकित प्रश्नाद्वारे सरकारचे लक्ष वेधल्यामुळे आता कोट्यवधींचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



