मुक्ताईनगरचे नाव जागतिक पातळीवर उज्वल; आयु. के. वाय. सुरवाडे यांना अमेरिकेतील विद्यापीठाची मानद डॉक्टरेट

मुक्ताईनगर — मुक्ताईनगर तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले आयु. के. वाय. सुरवाडे यांना अमेरिकेतील लुसंन्स स्टेट युनिव्हर्सिटी कडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. हा बहुमान केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याचा सन्मान नसून, संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यासाठी अभिमानाची व गौरवाची बाब ठरली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल मा. आमदार व माजी मंत्री श्री. एकनाथराव खडसे साहेबांनी स्वतः त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्री. सुरवाडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. या प्रसंगी खडसे साहेबांनी श्री. सुरवाडे यांच्या सामाजिक बांधिलकीचे, शैक्षणिक योगदानाचे व समाजप्रेरणादायी कार्याचे विशेष कौतुक केले.
“सामाजिक जाणीव, ज्ञानसाधना आणि मूल्याधिष्ठित विचारांच्या माध्यमातून समाज घडविण्याचे कार्य श्री. सुरवाडे सातत्याने करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणे ही मुक्ताईनगरसाठी अभिमानास्पद बाब आहे,” असे गौरवोद्गार यावेळी खडसे साहेबांनी काढले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांनी श्री. सुरवाडे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आयु. के. वाय. सुरवाडे यांना मिळालेली मानद डॉक्टरेट ही त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक व शैक्षणिक योगदानाची पावती असून, त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. हा सन्मान मुक्ताईनगर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे.



