संत परंपरेचा पावन संगम : भाऊबीज निमित्त श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे भक्तीमय सोहळा उत्साहात संपन्न

मुक्ताईनगर (वार्ता प्रतिनिधी) –
संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणाऱ्या भाऊबीज (यमद्वितीया) या मंगलपर्वाच्या शुभमुहूर्तावर संत परंपरेचा पावन संगम श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे अनुभवण्यास मिळाला. यानिमित्ताने संत मुक्ताईंच्या दोन्ही प्रमुख मंदिरांमध्ये महाराष्ट्रातील दोन पवित्र क्षेत्रांवरून आलेल्या साडी-चोळी अर्पण करण्याचा भक्तीमय सोहळा पार पडला, ज्यामुळे मुक्ताईनगर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
श्रीक्षेत्र आपेगावहून आणली संत मुक्ताईसाठी साडी-चोळी
विशेषतः, श्रीक्षेत्र आपेगाव (जि. जालना) येथून खास भगिनी मुक्ताईंसाठी आणलेली साडी-चोळी घेऊन ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज आपेगावकर यांनी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईंच्या नवीन मंदिरात आगमन केले. महाराजांच्या हस्ते विधिवत अभिषेक करण्यात आला. यानंतर भक्तिपूर्ण वातावरणात संत मुक्ताईंच्या मूर्तीस ही साडी-चोळी परिधान करण्यात आली.
या अलौकिक भक्तीमय सोहळ्यास परिसरातील तसेच राज्याच्या विविध भागांतून आलेले असंख्य भाविक उपस्थित होते. याप्रसंगी ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, ह.भ.प. भागवत महाराज पाटील, ह.भ.प. तुषार महाराज मिसाळ, ह.भ.प. मिसाळ महाराज, ह.भ.प. राजू महाराज सावंत सर आदींसह अनेक वारकरी आणि मान्यवर उपस्थित होते. मुक्ताई-ज्ञानोबांच्या बंधु-भगिनी प्रेमाची महती सांगणाऱ्या या प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावले.
मूळ मंदिरात आळंदीहून आलेल्या साडी-चोळीचा मान
दरम्यान, संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथील मूळ मंदिरातही परंपरेनुसार अत्यंत पवित्र असा विधी संपन्न झाला. श्रीक्षेत्र आळंदी (जि. पुणे) येथून आणलेली साडी-चोळी संत मुक्ताईंच्या समाधीस्थळी अभिषेक करून परिधान करण्यात आली.
या अत्यंत पवित्र विधीप्रसंगी संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र भैयासाहेब पाटील यांच्या हस्ते स्वतः ही साडी-चोळी संत मुक्ताईंना परिधान करण्यात आली. यावेळी संस्थानचे व्यवस्थापक ह.भ.प. उध्दव महाराज जुनारे तसेच अनेक संतसेवक, वारकरी आणि भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.
भक्तिभाव, परंपरा आणि संतसंस्कृतीचा संगम
भाऊबीज हा दिवस संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत मुक्ताई यांच्या अलौकिक बंधु-भगिनी प्रेमाचा प्रतीक म्हणून वारकरी संप्रदायात विशेष महत्त्वाचा मानला जातो. या पवित्र दिवशी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे एकाच वेळी ज्ञानोबांच्या जन्मभूमी (आपेगाव) आणि समाधीस्थळ (आळंदी) या दोन्ही ठिकाणांहून आलेले मानाचे वस्त्र संत मुक्ताईंना अर्पण झाले. यामुळे भक्तिभाव, परंपरा आणि महाराष्ट्राच्या संतसंस्कृतीचा अत्यंत विलोभनीय आणि प्रेरणादायी असा संगम अनुभवण्यास मिळाला.
दिवसभर मुक्ताईंच्या नामघोषाने आणि ‘ज्ञानोबा-माऊली तुकाराम’ च्या गजराने श्रीक्षेत्र मुक्ताईनगर भक्तिमय झाले होते. हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन संत मुक्ताईंचे दर्शन घेतले आणि भाऊबीजेचा हा पवित्र क्षण चिरस्मरणीय केला.



