मुक्ताईनगर: कोथळी शिवारात वाघाचे ठसे; नागरिकांत भीतीचे वातावरण, वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मात्र ‘पाठ’

मुक्ताईनगर: कोथळी शिवारात वाघाचे ठसे; नागरिकांत भीतीचे वातावरण, वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मात्र ‘पाठ’
मुक्ताईनगर, (प्रतिनिधी):
मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव-कोथळी शिवारात वाघाच्या पायाचे ठसे स्पष्टपणे आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, घटनेला काही कालावधी उलटूनही वन विभागाच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट न दिल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वाढत्या भीतीत शेतीची कामे ठप्प
मानेगाव-कोथळी शिवारातील ओढ्याच्या कडेला आणि शेताच्या बांधावर वाघाच्या पायाचे ठसे शेतकऱ्यांना दिसले. यानंतर तातडीने स्थानिक वन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असला तरी, परिसराचा पूर्णपणे सर्व्हेक्षण करणे गरजेचे होते. वाघाच्या भीतीने परिसरातील शेतीची कामे जवळपास थांबली आहेत.
नागरिकांचा संताप: ‘वन विभाग गंभीर नाही’
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी करणे, गावकऱ्यांशी संवाद साधणे आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी ढकलून याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. केवळ पायाचे ठसे पाहून न थांबता, वाघाचा वावर नेमका कोठून सुरू आहे, याचा तपास करण्यासाठी ट्रॅकिंग कॅमेऱ्यांचा वापर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
एका बाजूला शासनाचे ‘वन्यजीव संरक्षण’ अभियान सुरू असताना, दुसरीकडे लोकवस्तीच्या जवळ येऊन पोहोचलेल्या हिंस्त्र श्वापदाच्या मुद्द्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करणे हे अत्यंत संवेदनशीलतेचा अभाव दर्शवते. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असताना, वन विभागाने तत्काळ ठोस उपाययोजना करून लोकांचा विश्वास संपादन करणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ कागदोपत्री पंचनाम्याने या समस्येची सोडवणूक होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.



