“ओल्या दुष्काळाने विदारक चित्र; शेतकऱ्यांचा आक्रोश, सरकारच्या मदतीकडे आशावादी नजरा”
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत तर शेतजमिनी ओसाड होत आहेत.
आकडेवारी हृदय पिळवटून टाकणारी आहे – तब्बल ६५ लाख एकर शेतीचे पीक उद्ध्वस्त, ५०० घरे कोसळली, २५० गावे पूर्णपणे बाधित, तर १५० जणांचा जीव गेला. शेतकऱ्यांच्या जनावरांचा मोठा बळी गेला असून भूमिहीन शेतमजुरांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
या संकटात शेतकरी आणि शेतमजुरांचा एकच आवाज घुमतो आहे – “सरकारने तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करावे. पिकांचे संपूर्ण पंचनामे करून सरसकट ५० हजार रुपये प्रति एकर मदत द्यावी. तसेच भूमिहीन शेतमजुरांना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जावेत.”
अखिल भारतीय पँथर सेना जिल्हाध्यक्ष जळगाव पूर्व लखन पानपाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जोरदार हाक दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “शेतकरी हा देशाचा कणा आहे. आज त्याचाच कणा मोडला जात आहे. शासनाने तातडीने मदत केली नाही, तर शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर ढकलला जाईल.”
आज गरज आहे ती केवळ शब्दांच्या नाही तर कृतीची. शासनाने मदतीचे पॅकेज केवळ कागदावर जाहीर न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती पोहोचवले पाहिजे. कारण ओल्या दुष्काळाचे घाव केवळ शेतकऱ्यांच्या शेतातच नाहीत, तर त्यांच्या घराघरात उमटले आहेत.
शेतकऱ्यांचा आक्रोश, जनतेचे प्रश्न आणि शेतमजुरांचा हक्क – हे शासनाने तातडीने ओळखले नाही, तर ग्रामीण समाजात असंतोष पेट घेईल यात शंका नाही.



