मुक्ताईनगरात 434 बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे वाटप

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-
मुक्ताईनगर येथे ‘योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी’ या उपक्रमात नोंदणी केलेल्या इमारत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे (भांडी) वाटप करण्यात आले. 434 लाभार्थींना संच वाटप करण्यात आले. याआधी मुक्ताईनगर शहरात कामगारांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी देखील कॅम्प लावण्यात आला होता. आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक ठिकाणी नागरिकांना लाभ घेता यावा म्हणून या कॅम्पचे आयोजन केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून ही योजना राबवली जात असते. त्यातून कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच आरोग्यासाठी पाच लाखाचा विमा, मृत्यू पश्चात आर्थिक मदत, सुरक्षा संच, गृह उपयोगी वस्तू संच असे फायदे दिले जातात. गृह उपयोगी संचासाठी नोंदणी केलेल्या लाभार्थी यांना 7 मे रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत गृह उपयोगी संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील व प्रियंका पाटील यांच्या उपस्थितीत या कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. पुढील गृह उपयोगी संचाचे वाटप साहित्य आल्यानंतर 12 मे पासून सुरळीत केले जाईल. वाटप ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये म्हणून दर दिवशी वेळापत्रकानुसार तालुक्यातील चार गावातील लाभार्थी यांना गृह उपयोगी साहित्य वाटप केले जाईल. प्रत्येक गावाचा दिवस ठरून वेळापत्रकानुसार कॅम्पच्या ठिकाणी लावले जाईल. त्यानुसार मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांनी ज्या दिवशी ज्या गावाची वाटप असेल त्या ठिकाणी जाऊन या योजनेचा लाभ घ्यावा. गृह उपयोगी संचासाठी स्वतः लाभार्थी उपस्थित असणे आवश्यक आहे. सोबत बांधकाम कामगार ओळखपत्र, नोंदणी केलेली ऑनलाइन पावती व आधार कार्ड हे कागदपत्रे घेऊन गृह उपयोगी संच देताना लाभार्थी यांचा ऑनलाईन फोटो काढून वितरण केले जाते.
‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचे कडून हे काम मिळाले असून मुक्ताईनगर येथील संच वाटपाचे काम सुरू आहे नोंदणी केलेले लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच ही योजना मोफत आहे. खाजगी एजंट यांच्याकडून नागरिकांची लूट होत असते म्हणून त्यांना कोणीही पैसे देऊ नये.’
- प्रदिप साळी, गृह उपयोगी संच वाटप कंत्राटदार
‘ स्थानिक ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी कॅम्पचे आयोजन केल्याने तालुक्यातील नागरिकांची भटकंती थांबली आहे. ज्यांची नोंदणी नसेल त्यांनी नोंदणी करून घ्यावी व नोंदणी झालेल्या लाभार्थी यांनी कॅम्प ठिकाणी येऊन या योजनेचा लाभ घ्यावा.’
- वसंत भलभले, वाटप कॅम्प स्वयंसेवक



