खानदेशजळगावा जिल्हा

डोलारखेडा परिसरातील जंगलात बिबट्याचा मृत्यू

डोलारखेडा परिसरातील जंगलात बिबट्याचा मृत्यू

डोलारखेडा परिसरातील जंगलात एका साडेतीन ते चार वर्ष वयाच्या नर बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुक्ताई-भवानी अभयारण्यातील डोलारखेडा वनपरिमंडळातील कं.नं. 573 मध्ये ही घटना गस्तीदरम्यान उघडकीस आली.

काल दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास डोलारखेडा परिसरात गस्त घालत असलेल्या वनमजुरांना झुडपातून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. शोध घेतल्यावर एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. मृत बिबट्या नर जातीचा असून वय अंदाजे साडेतीन ते चार वर्षे असल्याचे समोर आले आहे.

मृत बिबट्याला आज दुपारी डोलारखेडा येथे आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. यश सागर, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास जाधव, डॉ. स्वागती करमांगे आणि डॉ. चव्हाण यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार बिबट्याचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचा दावा करण्यात येत आहे, मात्र व्हिसेरा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला असून अंतिम निष्कर्ष अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

ही संपूर्ण कार्यवाही उपवनसंरक्षक प्रविण ऐ यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपवनसंरक्षक उमेश बिराजदार, वनपरिक्षेत्र अधिकारी परीमल साळुंखे, डोलारखेडा वनपाल गणेश गवळी आणि अन्य वनकर्मचाऱ्यांनी पार पाडली. मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई आणि वनसमीती अध्यक्ष विनोद थाटे हेही उपस्थित होते.

दरम्यान, काही ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी बिबट्याला रस्ता ओलांडताना पाहिले होते आणि तो आजारी असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र वनविभागाने हे आरोप फेटाळले असून, बिबट्या पूर्णतः सक्षम असल्याचे कॅमेऱ्याद्वारे नोंदवले गेले असल्याचे स्पष्ट केले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी परीमल साळुंखे यांनी सांगितले की, “शवविच्छेदनात बिबट्याने शिकार केली असल्याचे अवशेष आढळले आहेत. त्यामुळे तो भुकेमुळे किंवा कमजोरीमुळे मरण पावल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.”

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button