महाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

धर्म ग्लानिचे बदलते संदर्भ!(भिमराव परघरमोल)

        १४ ऑक्टोबर १९५६ रोजी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाग लोकांच्या नागभूमीत, नाग नदीच्या काठी ऐतिहासिक धर्मांतर करून धम्मचक्र अनुप्रवर्तन केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ ऑक्टोबर १९५६ रोजी उपस्थित लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना नवबौद्धांची कर्तव्य काय असतील? त्यांनी स्वाभिमान पूर्ण जीवन कसे जगावे? धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी काय करावे? त्यासाठी आपल्या कमाईचा किती हिस्सा दान करावा? यासह धम्माच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी धम्म ग्लानी का होतो? या विषयाला सुद्धा  हात घातलेला दिसून येतो. त्यासाठी त्यांनी ग्रीक राजा मिलिंद यांचे उदाहरण दिलेले आहे. राजा मिलिंद (मीनांडर) हा वाद-विवाद पटू असल्यामुळे त्याला वाद-विवादाची मोठ्या प्रमाणात आवड होती. तो वाद-विवादासाठी अनेकांना आव्हान देत असे. त्याने वाद विवादामध्ये अनेकांचा पराजय सुद्धा केलेला होता.
       एकदा त्याने बुद्धांनुयायांना चर्चेसाठी आव्हान केले, म्हणून बौद्धांनी अरहंत पदाला पोहोचलेले विद्वान भंते महाथेरो नागसेनास विनंती केली. त्यांनी बौद्धांची बाजू मांडत राजा मिलिंद सोबत वादविवाद केला. त्यांचा तो वादविवाद, ती चर्चा 'मिलिंद पन्ह' म्हणजेच मिलिंद प्रश्न या नावाने ग्रंथरूपाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या या संवाद, वादविवाद तथा प्रश्नउत्तरांमध्ये मानवी जीवनाची उकल केलेली दिसून येते. त्यामधील तत्त्वज्ञानाला जागतिक कीर्तीच्या अनेक तत्ववेत्यांनी मान्यता दिलेली आहे. प्रश्न विचारणारा ज्ञानी आणि उत्तर देणारा महाज्ञानी कसा असतो, याचा तो उत्तम नमुना आहे. त्यामध्ये  दोघांच्याही बुद्धीची प्रगाढता, विवेकाची सखोलता आणि तेवढीच व्यक्तिमत्त्वाची शालिनीता यासह एकमेकांप्रती असणारा आदरभाव द्वेष विरहित चर्चेसह प्रश्नोत्तरांचा तो आदर्श नमुना असल्याचे निर्विवाद प्रतीत होते. त्यामध्ये राजा मिलिंद भंतेंना धम्मा संबंधित प्रश्न विचारताना म्हणतो की, धर्मास ग्लानी का येते? त्यावेळी उत्तर देताना भंते नागसेनानी धर्म ग्लानीची तीन कारणे सांगितली. पहिले कारण म्हणजे, एखादा धर्मच कच्चा असतो, त्या धर्माच्या मूळ तत्त्वात गांभीर्य नसते. तो कालिक धर्म ठरतो व काळापुरता असा धर्म टिकतो. दुसरे कारण असे की, धर्मप्रसार करणारे लोक जर विद्वान नसतील तर धर्म ग्लानी होतो. ज्ञानी लोकांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे. वाद-विवाद करण्यास प्रचारक सिद्ध नसतील तर, धर्माला ग्लानी येते? आणि तिसरे कारण म्हणजे, धर्म व धर्माची तत्वे विद्वानांसाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांसाठी विहारे व मंदिरे असतात. तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतींचे ते पूजन करतात.
        डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ ला धर्मांतराची घोषणा करून, तब्बल २१ वर्षांनी धर्मांतर केले. या प्रदीर्घ कालावधीमध्ये कित्येक स्थित्यंतरे झाली. अनेक धर्मगुरू, धर्मप्रचारक, धर्म संस्थापक त्यांना येऊन भेटले. आम्ही आपणासाठी पायघड्या अंथरल्याची त्यांनी साद घातली. इच्छित विचारले, मानसन्मान देऊन अमिष सुद्धा  पुढ्यात ठेवले.
           डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  मधल्या काळात सर्व धर्मांचा सखोल व तौलणिक अभ्यास करून प्रत्येक धर्माची काही कसोट्यांनी चाचपणी केली. ती म्हणजे, धर्म हा विज्ञानाशी विसंगत नको. तसे असल्यास तो लोकआदरास पात्र ठरत नाही. तो हास्यास्पद ठरून जीवन विषयक तत्त्वज्ञान रुजवण्यास असमर्थ ठरतो. याचा अर्थ धर्माचा संबंध कार्यकारणाशी म्हणजेच विज्ञानाची दृढतर असावयास पाहिजे. दुसरे म्हणजे, तो नीतिमत्तेवर आधारित असावा. तिसरे तो समाज धारणेस योग्य ठरावा म्हणून फक्त नीतीबद्ध असून चालत नाही, तर त्याने स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या त्रयींच्या चाचणीत उतरले पाहिजे. तसेच त्याने दारिद्र्याचे गोडवे गाऊ नये, त्याचे उदात्तीकरण करू नये. गरीबी हे पूर्वजन्माचे फळ आहे, असे दारिद्र्याचे गोडवे गायले तर धर्माचा विपर्यास होतो. म्हणजे गुन्हेगारीला चीर स्थायी रूप प्राप्त करून देण्यासारखे होते, तर नरकाच्या कल्पनेप्रमाणे यातनायुक्त जीवनाला मान्यता देणे होते.
           डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हिंदू धर्माचा त्याग करण्याचे योजले होते, तो वरील कसोट्यांना उतरणे शक्यच नव्हते. अन्यथा त्यांनी त्याचा त्यागच केला नसता.  जगातील इतर काही धर्म एक ना दोन कसोट्यांमध्ये उतरले. परंतु बुद्धाचा एकमेव धम्मच फक्त संपूर्ण कसोट्यांना पूर्णपणे उतरताना दिसून आला. किंबहुना तोच धम्म  समाज धारणेस पात्र असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
         बुद्ध धम्माची ध्येय उद्दिष्टे ही मानव केंद्रित असून, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व या महान मानवी मूल्याधारित समाज व्यवस्था निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. तथागत बुद्धाने दुःखाचे अस्तित्व मान्य केले. तत्पूर्वी त्यांच्याप्रमाणेच इतरही काही तत्त्ववेत्यांनी दुःखाच्या अस्तित्वाला मान्यता दिल्याचे पुरावे मिळतात. परंतु दुःखाचे निराकरण करणारा मार्ग किंवा तत्वज्ञान कोणाकडेच नव्हते. ते केवळ तथागत बुद्धानेच संशोधित केले.
          त्यांनी संशोधित केलेल्या मार्गाने जर कोणी प्रवास केला तर, तो निब्बानाच्या मुक्कामाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता. निब्बान म्हणजे काय? तर सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या (राग, द्वेष, मोह, जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दौर्मनस्य, निराशा) ज्वालांवर निग्रह साधने. बुद्धाने असे विकार मुक्त, अनासक्त जीवन जगणाऱ्यांचा एक समूह निर्माण केला. ज्याचे नाव भिक्षु संघ असे आहे. त्या भिक्षु संघाच्या माध्यमातून मानव जातीसह संपूर्ण जीवसृष्टीची त्यांनी काळजी वाहिली. करुणेच्याही पलीकडे, त्यांनी मैत्री भावना विकसित केली. त्यामुळे  धम्म लोकआदरास पात्र ठरला. अनेकांनी त्याला अंगीकारले. अनेक राज्यांनी त्याला आश्रय दिला, त्यामुळे तो राजधर्म ठरला. परिणामत: त्याने साता-समुद्रापार झेप घेतली.
          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करताना विविध धर्माच्या विविध पैलूंची तपासणी केली. अन्यथा आगीतून निघून फुफाट्यात पडल्यागत दशा व्हायला नको. अशी त्यांची धारणा असल्यामुळे भारत भूमीतूनच उदयाला आलेला, जो धर्म नसून धम्म आहे. ज्यामध्ये ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, कर्मकांड याला अजिबात थारा नाही. जो अनुभवावर आधारित असून बुद्धीवादी आहे. जो अपौरुषयतेचा कधीच दावा करत नाही. जो येही पस्सीको (ये आणि पहा) असा आहे. अशा बुद्धाच्या धम्माला त्यांनी प्राधान्य दिले.
         हा देश फक्त बुद्धाच्या तत्त्वज्ञानानेच तरू शकतो, जीवनकलहात टिकाव धरू शकतो. अन्यथा तो रसातळाला जाण्यास वेळ लागणार नाही. अशी त्यांची पक्की खात्री होती.    
       जेव्हा  धर्मांतरापूर्वी त्यांना संविधान साकारण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी समाज सुव्यवस्थेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचा विचार केला. समाजसुव्यवस्था टिकण्यासाठी नीतिमत्तेची आणि कायद्याची गरज असते. बहुसंख्यांक लोक नीतिमत्तेने वागतात, तर इतरांसाठी कायदा असतो. कायद्याने त्यांचा बंदोबस्त करता येतो. म्हणून दोन्ही बाबींचा सुरेख संगम संविधानामध्ये दिसून येतो.
         लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी संविधान हे एक साधन आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या मानवी मूल्याधारित समाज व्यवस्था निर्माण करणे हे लोकशाहीचे अंतिम ध्येय असते. त्यासाठी संविधान हे  सर्वोत्तम तथा प्रभावी साधन आहे यात कसलीही शंका नाही. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर २५ नोव्हेंबर १९४९ च्या संविधान सभेतील आपल्या शेवटच्या भाषणात म्हणतात की, "समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व ही मानवी मूल्य मी  फ्रेंच राज्यक्रांती पासून घेतली असे कोणीही समजू नये. तर ती; मी माझे गुरु तथागत गौतम बुद्धाकडून घेतलेली आहेत." पुढे ते असेही म्हणतात की,  "पूर्वीही भारत देशात लोकशाही नांदत होती. एकेकाळी भारत देश गणराज्यांनी भरगच्च होता. भिक्षु संघाच्या ज्या सभा चालायच्या ते सर्व संसदेचं दुसरं रूपच होतं. संघाची सर्व कारवाई ही संसदेच्या कारवाईप्रमाणे चालत होती."
         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यातील त्यांनी देशाला दिलेली सर्वोत्तम भेट म्हणजे, भारतीय संविधान आणि तथागत बुद्धाचा धम्म होय. जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांचेही अंतिम ध्येय मानवी जीवनातील दुःख नष्ट करणे हेच आहे. धम्माने आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंचशील अष्टांगिक  मार्ग व दहा पारमिता दिल्या. तर संविधानाने मूलभूत हक्क-अधिकार, निती-निर्देशक तत्व व मूलभूत कर्तव्य दिली आहेत. बुद्धाने  कालबाह्य विचार काढून फेकण्याचे स्वातंत्र्य दिले. तर संविधानाने मानवी व्यक्तिमत्त्वाला न्यूनता आणणाऱ्या विचारांवर  कायमची बंदी घालून, नव्याने तसे कायदे  करण्याचे अधिकार नाकारले. सोबतच नवीन पिढीचे बदलते विचार, समस्या, मागण्या, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एखादा विचार, कायदा अपुरा पडत असेल तर, त्याला निरसीत करणे, फेरबदल करणे किंवा नव्याने तयार करण्याचे अधिकार संसदेला बहाल केले.
        म्हणजेच धम्माचे प्रतीरूप असलेली लोकशाही प्रस्थापित करण्याचे परमोच्च साधन म्हणजे संविधान. त्याचीच आज  प्रताळणा होताना दिसत आहे. त्याला हादरे देण्याचे काम जोरात सुरू आहे. त्याला बदलण्यासाठीच आम्ही सत्तास्थाने प्राप्त केली आहेत. त्याला ग्लानी आणणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. असे निर्भीड बोलणाऱ्यांची संख्या आज वाढताना दिसत आहे. धम्माला ग्लानी आली तर मानव जात दुःखी होऊन वेळप्रसंगी ती नष्टही होऊ शकते. तशी संविधानाला म्हणजेच लोकशाहीला ग्लानी आली तर, गुलामी, विषमता, उच्चनीचता, द्वेष, मत्सर, तिरस्कार आणि अन्याय पसरून मानवी मूल्य रसातळाला जातील. त्यामुळे विषमतावाद्यांचं फावेल, म्हणून संविधान अंमलबजावणीचा लोकाग्रह, ही चळवळ जोमाने उभी राहावी. अन्यथा मनुस्मृतीचे राज्य येण्यास वेळ लागणार नाही.

           भिमराव परघरमोल      
     लेखक, व्याख्याता तथा अभ्यासक 
     फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा 
       तेल्हारा जि. अकोला
       मो.९६०४०५६१०४

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button