जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा निर्घृण खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला


रावेर |
प्रतिनिधी : विकास आमोदकर
| स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाचा खून करून तो अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, रावेर पोलिसांनी अत्यंत तत्पर, वैज्ञानिक व कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या काही तासांत या खुनाचा पर्दाफाश करून आरोपीला अटक केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत आढळून आल्याने रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ३५८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासात मयताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९, रा. गारखेडा, ता. रावेर) याच्यासोबत जमिनीच्या कारणावरून सातत्याने वाद सुरू असल्याचे समोर आले.
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, दि. २१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता आरोपीने लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात रामा थावरू बारेला यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन पायवाटेजवळील नाल्याच्या कडेला टाकला, जेणेकरून हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा आभास निर्माण होईल.
मात्र, रावेर पोलिसांनी बारकाईने व वैज्ञानिक पद्धतीने तपास करत हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला. आरोपी अनिल जखा बारेला याला दि. २२ जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली असून, चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



