हरिनामाच्या गजराने संतभूमी कोथळी दुमदुमली:एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस उत्साहात

राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) यांच्या अमृत महोत्सवी (७५ व्या) पदार्पणानिमित्त श्रीक्षेत्र कोथळी येथील पावन व पवित्र श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात भक्तीचा मोगरा बहरला आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तथा संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा’ दुसरा दिवस आज अत्यंत भक्तिमय, चैतन्यमयी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीची प्रभात भक्तीच्या दिव्य वातावरणात झाली. भल्या पहाटे काकडा आरतीच्या सुश्राव्य स्वरांनी, श्री विष्णू सहस्रनामाच्या जयघोषाने आणि श्री संत मुक्ताई यांच्या चरित्र वाचनाने ज्ञानयज्ञाची सुरुवात झाली. प्रभाताच्या या पावन समयी संपूर्ण मंदिर परिसर अध्यात्मिक ऊर्जेने उजळून निघाला होता.
त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. बबनराव महाराज आंबेकर यांचे सुश्राव्य आणि भावपूर्ण प्रवचन पार पडले. आपल्या ओघवत्या वाणीतून त्यांनी अध्यात्माचे सार व संत परंपरेचे महत्त्व सांगत उपस्थितांना भक्तीच्या अलौकिक विश्वात नेले. मध्यान्ह समयी श्री संत मुक्ताईंच्या कृपाप्रसादाचा महाप्रसाद पार पडल्यानंतर, दुपारी २ ते ५ या वेळेत ह.भ.प. श्री. खगेन्द्रजी महाराज (शहादेकर) यांच्या रसाळ मुखारविंदातून संगीत श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ झाला. संगीताच्या तालावर आणि महाराजांच्या बहारदार निरूपणाने भाविक कमालीचे मंतरून गेले होते.
सायंकाळच्या सुमारास टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘भानूकुळ भुषण’ संत मुक्ताईंच्या जयघोषात हरिपाठ संपन्न झाला. त्यानंतर श्रींची आरती करून रात्री ह.भ.प. अंकुश महाराज न्हागरे (गेवराई, बीड) यांच्या ओघवत्या आणि ज्ञानयुक्त वाणीतून कीर्तन सोहळा रंगला.
विठ्ठल नामाचा गजर, टाळांची चिपळी, मृदुंगाचा ठेका आणि संतांच्या जयघोषाने संपूर्ण कोथळी नगरी जणू वैकुंठधाम बनली आहे. या अध्यात्मिक आनंदोत्सवाचा व ज्ञानयज्ञाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील, पंचक्रोशीतील हजारो वारकरी, भाविक भक्त आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तीच्या अलौकिक प्रवाहात तल्लीन होत आहेत.



