हरताळा शिवारात वाघिणीचा रहिवास; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, मजुरांचा कामावर बहिष्कार हरताळा

(ता. मुक्ताईनगर) | प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा शिवारात वाघिणीचा रहिवास झाल्याची शक्यता आता अधिक बळकट झाली आहे. गट नंबर 395 मध्ये मका काढणीचे काम सुरू असताना मजुरांना प्रत्यक्ष वाघीण दिसल्याचा दावा करण्यात आला असून, परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
सोपान दांडगे यांच्या शेतात काही महिला व पुरुष मजूर मका काढत असताना त्यांनी शेतात हालचाल जाणवली. नीट पाहिल्यावर वाघासारखे जनावर दिसताच सर्वजण घाबरले आणि पळ काढला. ही घटना क्षणात गावभर पसरली. शेतमालक दांडगे यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली.
वन विभागाच्या दीपाली बेलदार व रूपाली शिर्के या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणीदरम्यान शेतात वाघाचे पगमार्क्स (पायाचे ठसे) आढळून आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तथापि, जमिनीचा पृष्ठभाग कोरडा असल्यामुळे ठसा पूर्णपणे स्पष्ट उमटला नसल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. तरीही, स्थानिक शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या साक्षीनुसार वाघिणीचा या भागात वावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
या परिसरात मका, तूर आणि केळी यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. सध्या काढणीचा हंगाम सुरू असून, वाघिणीच्या भीतीमुळे मजुरांनी शेतात जाण्यास नकार दिला आहे. परिणामी, उभ्या पिकांच्या नासाडीची भीती शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आत्मसुरक्षेसाठी परवानाधारक बंदुका परत देण्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान या बंदुका जमा करण्यात आल्या होत्या, परंतु निवडणूक संपल्यानंतरही त्या अद्याप परत न मिळाल्याने शेतकरी असुरक्षिततेची भावना व्यक्त करत आहेत.
वन विभागाने परिसरात गस्त वाढविण्याचे आदेश दिले असून, वाघिणीचा वावर निश्चित करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावण्याची तयारी सुरू केली आहे.



