सोनाळा येथील पंचशील नगरातील घर-जागा नियमितीकरणासाठी नागरिकांचे तहसील प्रशासनाला निवेदन; तात्काळ कारवाईची मागणी…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २८ एप्रिल २०२६
तालुक्यातील सोनाळा पंचशील नगर परिसरातील रहिवाशांनी शासन निर्णय मार्च २०२६ नुसार घर व जागांचे नियमितीकरण तात्काळ करण्यात यावे, या मागणीसाठी तहसील प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अद्यापही नियमितीकरणाचा लाभ मिळाला नसल्याने विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोनाळा येथील पंचशील नगर परिसरातील रहिवासी मागील ५० ते ६० वर्षांपासून येथे वास्तव्यास असून शासनाच्या निर्णयानुसार त्यांच्या घर-जागांचे नियमितीकरण होणे आवश्यक आहे. मात्र आजपर्यंत याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नियमितीकरण न झाल्यामुळे रहिवाशांना घरकुल योजना, शासकीय सुविधा, विविध योजनांचा लाभ तसेच कायदेशीर संरक्षण मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
याप्रकरणी पंचशील नगरातील सर्व प्रकरणांची तात्काळ तपासणी करून नियमितीकरणाची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच १० दिवसांच्या आत योग्य निर्णय न झाल्यास सोनाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन, उपोषण अथवा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी आकाश वानखडे सामाजिक कार्यकर्ते सुजित बांगर यांच्यासह पंचशील नगर सोनाळा येथील रहिवाशी महिलांसह पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी निवेदनावर आकाश वानखडे ( सावन सोनाळा ), सामाजिक कार्यकर्ते सुजित बांगर,दिशांत अजने, सुनीता वानखडे, महादेव अजने, विलास वानखडे, बेबाबाई सरदार, संगीता वानखडे, राजेश नितवणे, उमेश आंभोरे, वेणूबाई तायडे, विनोद वानखडे, मायाबाई सरदार, दादाराव सरदार, सुनील सुलताने, संतोष सरदार, रत्नकला नितवणे,विष्णु तायडे,करण तायडे,
जयकिसन हिवराळे, प्रमिला कोकाटे, दुर्गाबाई वानखडे, दीपक तायडे, विशाल तायडे, आनंद हिवराळे, देवराव समदुर, जंगलूमन गवई, मनोहर तायडे, एम.डी. तौसीफ शेख इस्माईल, केसरबाई गव्हांदे, मंजुबाई गव्हादे, सागर सोनोने, बाबुराव समदुर, व सामाजिक कार्यकर्ते सौरभ बावस्कर यांच्या सह्या आहेत.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद, गटविकास अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर, ग्रामपंचायत कार्यालय सोनाळा, पोलीस स्टेशन सोनाळा तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत……✍️



