सेवा पंधरवडा २०२५ : समाजसेवेची नवी दिशा, नियोजन जामनेरमधून

जामनेर । प्रतिनिधी
“राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही, तर समाजासाठी सेवा हीच खरी ध्येयवेड आहे” — याच भावनेतून भारतीय जनता पार्टी देशभरात “सेवा पंधरवडा २०२५” साजरा करण्यास सज्ज झाली आहे. दिनांक १७ सप्टेंबर या दिवशी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जन्मदिनी सुरू होणारा हा उपक्रम थेट महात्मा गांधी जयंती, २ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.
या निमित्ताने जामनेर येथे “जिल्हा कार्यशाळा” आयोजित करण्यात आली. यात मंत्री गिरीषजी महाजन व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पंतप्रधान मोदीजींच्या सेवा, स्वच्छता व आत्मनिर्भरतेच्या मूल्यांवर आधारित उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
“सेवा पंधरवडा” अंतर्गत रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहिमा, “नमो युवा रन” मॅरेथॉन, चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण, सामाजिक मदतकार्य, तसेच आत्मनिर्भर भारतासाठी जनजागृती या विविध उपक्रमांचा समावेश असेल. या सर्व उपक्रमांतून समाजातील प्रत्येक घटकाला थेट स्पर्श होईल, हीच या अभियानाची खरी ताकद आहे.
या कार्यशाळेत आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जळगाव शहर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी आदी मान्यवरांसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीतून स्पष्ट झाले की, सेवा पंधरवडा हा केवळ औपचारिक उपक्रम न राहता, तो जनतेशी थेट नाळ जुळविणारा आणि समाजाला सकारात्मक बदलाकडे नेणारा ठरणार आहे.



