बुलढाणा जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करा; देऊळगाव राजा काँग्रेसची तहसीलदार व आमदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बुलढाणा जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करा; देऊळगाव राजा काँग्रेसची तहसीलदार व आमदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालू हंगामात अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. जिल्ह्यातील पिकांचे आतोनात नुकसान झाले असून, बुलढाणा जिल्हा त्वरित सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी आज १६ सप्टेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, देऊळगाव राजा यांच्या वतीने तहसीलदार आणि आमदार मनोज कायंदे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत दयनीय परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. चालू वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भाजीपाला या सर्वच पिकांचे सुमारे ७० ते ७५ टक्के नुकसान झाले आहे.
परिपक्व होण्याच्या अवस्थेतच पाऊस गायब झाल्याने ही पिके ९० ते ९५ टक्के करपून पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आता आगामी काळात कितीही पाऊस झाला, तरीही ही पिके पुन्हा उभी राहणे अशक्य आहे. यामुळे शेतकरी राजा पूर्णपणे हवालदील झाला असून त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे.शेतकऱ्यांचे हे मोठे संकट लक्षात घेता, शासनाने कोणताही विलंब न लावता तातडीने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच, संपूर्ण बुलढाणा जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे. यासोबतच, शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा मंजूर करून तो त्वरित वितरित करण्यात यावा, अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेत्यांची होती उपस्थिती,हे निवेदन रामदास डोईफोडे,अतिश कासारे, रमेशदादा कायंदे,अनिल सावजी व हनीफ शाह प्रामुख्याने उपस्थित होते.यांच्यासह यश कासारे, बाबासाहेब कोल्हे, राजाराम कोल्हे, मतीन चाऊस, राजाराम खंडेभराड, रवींद्र इंगळे, इनायत खा हाजी खा, मुबारकभाई, चंद्रभान झीने, अभय मघाडे, धोंडीराम लंके, पियुष कासारे, आकाश कासारे, भानू तिडके, धोंडीराम ढगे यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, सरकारने या मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.



