बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बोटांचे ठसे न जुळले तरी कर्जमुक्तीचा लाभ मिळणार ; शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची पर्यायी सुविधा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. १६ : वयस्करपणा किंवा अन्य कारणांमुळे बोटांचे ठसे नोंदविता येत नसलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणात अडथळा येऊ नये, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पर्यायी प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बोटांचे ठसे तीन वेळा घेण्याचा प्रयत्न करूनही प्रमाणीकरण न झाल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ (Unable to Authenticate) हा पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करता येणार आहे.

राज्य शासनाने दि. २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरू केली आहे. योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे होत असून, शासनाने यासाठी महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीमार्फत संगणकीय संस्करण करून ९६.९६ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी २३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

आधार प्रमाणीकरण करताना एका बोटाचा ठसा नोंदविला जात नसल्यास वेगवेगळ्या बोटांनी किमान तीन वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. त्यानंतरही प्रमाणीकरण न झाल्यास ‘प्रमाणीकरण शक्य नाही’ हा पर्याय वापरण्यात यावा. या पर्यायानंतर संबंधित आपले सरकार सेवा केंद्र चालकाने स्वतःच्या बोटांच्या ठशांद्वारे आधार प्रमाणीकरण करावे.

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तालुकास्तरीय समितीकडे (TLC) पोर्टलद्वारे पाठविण्यात येईल. संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा आदी ओळख निश्चित करणारी कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे. TLC मार्फत कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित करण्यात येईल. आधार क्रमांक योग्य असल्यास तक्रार मान्य करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर वयस्कर अथवा बोटांचे ठसे नोंदविता न येणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमुक्तीच्या लाभाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने नियमानुसार जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button