वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठीलोकसहभाग महत्वाचा – दीपक महाराज

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

नितीन गटाणी । पाथर्डी : तापमान ४० / ४२ डिग्रीपर्यंत पोहोचले असून जंगलातील पाण्याचे स्रोत संपलेले आहेत. त्यामुळे जंगलातील वन्य प्राणी व पक्षी घोटभर पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून प्रत्येकाने पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन ह.भ.प. दीपक महाराज काळे यांनी केले आहे.
पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटातील वनविभागाच्या पाणवठ्यामध्ये शुक्रवारी दीपक महाराज काळे, युवानेते विवेक मोरे, शुभम औटी, अक्षय मराठे, गणेश भाकरे, अंकुश शिंदे, नितीन मोरे, मयूर अकोलकर, अभिजीत मराठे, आदित्य पवार यांच्यासह निसर्गमित्रांनी एकत्रित येत करंजी व मराठवाडी परिसरातील जंगलात असलेल्या वनविभागाच्या पाणवठ्यामध्ये लोक वर्गणीतून टँकरद्वारे पाणी टाकले आहे. याची सुरुवात सदगुरु गव्हाणे बाबा मंदिराजवळील पाणवठ्यामध्ये पाणी सोडून केली आहे. ज्या व्यक्तींना जंगलातील वन्य प्राण्यांसह पक्षांची तहान भागवण्यासाठी मदत करायची इच्छा आहे अशा व्यक्तींनी सामाजिक बांधिलकी म्हणून दीपक महाराज व विवेक मोरे यांच्याशी संपर्कसाधून त्यांच्याकडे मदतीचा हात द्यावा. त्यामुळे उर्वरित पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी टाकून या जंगल परिसरातील वन्यप्राणी व पक्षांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर होईल.
*चौकट*
करंजी परिसरातील वनविभागाच्या हद्दीतील सर्व पाणवठे कोरडेठाक असल्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जीव धोक्यात घालून मानवी वस्तीकडे जाण्याची वेळ आली आहे. वनविभागाने वन्य प्राण्यांना व पक्षांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले ही मोठी चिंतेची बाब असल्यामुळे तरुणांच्या सहभागातून जंगलातील पाणवठ्यांत टँकरने पाणी टाकण्याची वेळ आली आहे.



