स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचा चौथा वर्धापन दिन थाटात संपन्न; पाचव्या वर्षात दमदार पदार्पण

शेगाव, दि. ५ एप्रिल :
लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस वृत्तवाहिनीचा चौथा वर्धापन दिन शेगाव येथे उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. बेलदार समाज मंगल कार्यालय, नंदनवन नगर येथे पार पडलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गजानन महाराज, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक सचिन झनके होते. मंचावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आपल्या मनोगतातून वृत्तवाहिनीच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, संपादक, शिक्षक, विद्यार्थी, विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी तसेच समाजसेवी संस्थांचा शाल-श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात सचिन झनके यांनी सांगितले की, “चार वर्षांपूर्वी लावलेले छोटे रोप आज वटवृक्षात रूपांतरित झाले असून स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ही वृत्तवाहिनी ४ लाखांहून अधिक दर्शकांपर्यंत पोहोचली आहे. फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर मजबूत उपस्थिती निर्माण केल्यानंतर लवकरच (RNI) नोंदणीकृत वृत्तपत्र स्वरूपातही सेवा सुरू केली जाणार आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वृत्तवाहिनीच्या सर्व प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कैलासराव सुलताने यांनी केले, तर आभार प्रदर्शन भगवान पाखरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
— विजय घोडे, प्रतिनिधी



