श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण आयोजनासाठी आढावा बैठक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । १७ जानेवारी २०२७ रोजी शेगाव येथे श्री गजानन विजय ग्रंथाचे महापारायणाचे आयोजनासाठी २४ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठक शेगाव येथे होईल.
संत गजानन भक्त परिवाराची स्थापना सन २००८ मध्ये ग.म.भक्त शशिकांत पोकळे यांनी केली. ज्याद्वारे श्री गजानन महाराजांच्या जगभरातील लाखो भक्तांना विविध उपासना माध्यमांतून एकत्र आणण्याचे कार्य सुरू केले आहे. गुरुवार पारायण, दशमी एकादशी द्वादशी पारायण, २१ दिवसीय पारायण, अमरावती मध्यवर्ती कारागृह तसेच येरवडा कारागृह पुणे येथे पारायण, गण गण गणांत बोते तसेच श्रीराम जय राम जय जय राम मंत्रजप, जागतिक पारायण आणि महापारायण अशा विविध उपासना उपक्रमांमध्ये दरवर्षी जगभरातील लाखो भक्त उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात.
या सर्व उपासनांमधील अत्यंत महत्त्वाचा आणि भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेला उपक्रम म्हणजे दरवर्षी आयोजित करण्यात येणारे श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण होय.
२१ जानेवारी २०१८ रोजी संत गजानन भक्त परिवाराने अमरावती येथे तब्बल ३५,००० भक्तांच्या उपस्थितीत अतिभव्य महापारायणाचे यशस्वी आयोजन केले होते. त्या वेळी संपूर्ण अमरावती नगरी दोन दिवस गजाननमय झाली होती. भारतभरातून आलेल्या हजारो भक्तांनी या अभूतपूर्व सोहळ्यात सहभागी होत पारायणाचा दिव्य अनुभव घेतला. त्यानंतर अहिल्यानगर, श्री क्षेत्र पंढरपूर आणि मानवत येथेही अशाच स्वरूपाची भव्य महापारायणे यशस्वीरीत्या पार पडली. प्रत्येक ठिकाणी १२,००० पेक्षा अधिक भक्तांनी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने सहभाग नोंदवला.
आता १७ जानेवारी २०२७ रोजी शेगाव येथे भव्य श्री गजानन विजय ग्रंथ महापारायण व्हावे, अशी हजारो गजानन भक्तांची मनापासून इच्छा व्यक्त होत आहे.
या दिव्य आणि व्यापक अध्यात्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात मानवी तसेच आर्थिक सहकार्याची आवश्यकता असून, शेगावात महापारायणाचे नियोजन आणि आयोजन कसे यशस्वी करता येईल यासाठी प्राथमिक आढावा घेणे अत्यंत आवश्यक आहे. महाराजांच्या कृपेने आणि भक्तांच्या सहकार्याने यापूर्वीची सर्व महापारायणे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली आहेत. त्या अनुषंगाने २४ मे २०२६, रविवार रोजी दुपारी ३:०० वाजता शेगाव येथे महापारायण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या गजानन भक्तांची या पवित्र आयोजनात तन, मन आणि धनाने पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग नोंदवण्याची मनापासून इच्छा आहे, त्यांनी आपले नाव व गाव ७४८७००४४४६ या क्रमांकावर पाठवावे. संबंधित भक्तांशी पुढील संपर्क साधण्यात येईल, अशी माहिती संत गजानन भक्त परिवाराचे शेगाव येथील संयोजक संतोष ढगे यांनी दिली आहे



