आरक्षण उपवर्गीकरणाच्या आंदोलनाच्या नियोजनादरम्यान ज्येष्ठ आंबेडकरी नेते अशोक गायकवाड यांचे निधन…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
जळगाव जामोद:- ३ ऑगस्ट २०२६
आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चाच्या नियोजनासंदर्भात माहिती देण्यासाठी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ज्येष्ठ आंबेडकरी नेते अशोक रामचंद्र गायकवाड (वय ७२) यांना अचानक अस्वस्थता आली. ते व्यासपीठावरच कोसळले आणि “जय भीम” असा अखेरचा उच्चार करत त्यांनी अंतिम श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील आंबेडकरवादी आणि दलित चळवळीतील मोठे नेतृत्व म्हणून ओळख असलेले अशोक गायकवाड यांनी आयुष्यभर सामाजिक न्याय, दलित हक्क आणि कष्टकरी समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. दलित पँथर चळवळीपासून ते विविध सामाजिक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
आंदोलनाच्या नियोजनासाठी पत्रकार परिषद घेत असतानाच त्यांचे निधन झाल्याने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. अखेरच्या क्षणापर्यंत समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या लढवय्या नेत्याने संघर्षाच्या वाटेवरच निरोप घेतला, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या निधनाने अहिल्यानगरसह राज्यातील आंबेडकरी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे……✍️



