“खाकीच्या सावलीत ‘खादी’चा खेळ?” मुक्ताईनगरात तोतया पोलिसांच्या नावाखाली गुटखा लूट प्रकरणाने उडवली खळबळ!

मुक्ताईनगरात ‘विमल’ लूट प्रकरणाला गंभीर वळण; राजकीय पदाधिकारी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या संगनमताची चर्चा
मुक्ताईनगर ( अमोल वैद्य )
महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू असली तरी मुक्ताईनगरात मात्र बंदी केवळ कागदावरच असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. मात्र यावेळी अवैध गुटखा वाहतुकीसोबतच ‘तोतया पोलिसां’च्या माध्यमातून झालेल्या कथित लूटप्रकरणामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. बुऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमीजवळ दि. १६ मे २०२६ रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळासह पोलीस प्रशासनावरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कारमधून नेण्यात येत असलेला अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांचा अवैध विमल गुटखा काही कथित राजकीय पदाधिकाऱ्यांनी अडवून लुटल्याची चर्चा शहरात रंगली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण प्रकारात काही पोलीस कर्मचाऱ्यांचेही अप्रत्यक्ष सहकार्य असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही जणांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवत वाहन अडवून उघडपणे ‘तोडीपाणी’ केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला असल्याचे समजते.
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, या कथित कारवाईसाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडी एका होमगार्डशी संबंधित असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेमधील काही घटकच अशा प्रकारांना पाठीशी घालत आहेत का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
विशेष म्हणजे, लाखो रुपयांच्या गुटखा लुटीचा प्रकार घडूनही अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नसल्याने मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. शहरात सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू असताना पोलिसांची शांत भूमिका अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे.
या घटनेमुळे मुक्ताईनगरात भविष्यात तोतया पोलीस बनून सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्यांच्याच नावाचा वापर करून जर वसुली आणि लूट सुरू होत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे, असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
जनतेसमोर उभे राहिलेले गंभीर प्रश्न :
- महाराष्ट्रात गुटखाबंदी असताना मुक्ताईनगरात लाखो रुपयांचा गुटखा येतोच कसा?
- या अवैध धंद्याला नेमका कोणाचा राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त आहे?
- तोतया पोलीस बनून वसुली करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कारवाई करणार का?
- भविष्यात अशी गुन्हेगारी वाढल्यास सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार?
- पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या प्रकारामागे नेमके कोण?
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी झाल्यास अनेक बडे राजकीय पदाधिकारी आणि काही भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांचे चेहरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी संबंधित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वृत्त लिहीपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पोलिसांची ही शांतता नेमकी कोणाला वाचवण्यासाठी आहे का, अशीही चर्चा आता मुक्ताईनगरच्या चौकाचौकात रंगू लागली आहे.



