राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये हिंदी भाषा दिनानिमित्त भिंतीपत्रक प्रदर्शन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये हिंदी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी हिंदी साहित्य, भाषा आणि संस्कृतीचा गौरव करणारे भिंतीपत्रक प्रदर्शन उत्साहात आयोजित केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्या समृद्ध परंपरेचा अभ्यास करून विविध साहित्यिकांच्या कार्याचा परिचय सर्वांसमोर प्रभावीपणे मांडला.
भिंतीपत्रक तयार करताना मिताली मॅडम, प्रिया मॅडम आणि गोजरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे चार ते पाच विद्यार्थ्यांचे गट तयार करून प्रत्येक गटाला स्वतंत्र विषय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी संशोधन करून आकर्षक व माहितीपूर्ण भिंतीपत्रके तयार केली.
विद्यार्थ्यांनी रवींद्रनाथ टागोर, मुंशी प्रेमचंद, मैथिलीशरण गुप्त, हरिशंकर परसाई, हबीब तनवीर, कैफी आझमी, सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’, गुलजार, मीराबाई, सुभद्रा कुमारी चौहान, संत रविदास, डॉ. धर्मवीर भारती, शेखर जोशी, जयशंकर प्रसाद यांसारख्या अनेक कवी, लेखक व साहित्यिकांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून त्यांचे हिंदी भाषेसाठीचे योगदान सुंदर पद्धतीने सादर केले. साहित्यिकांच्या कविता, कादंबऱ्या, आत्मचरित्रे तसेच समाजहितासाठी केलेल्या कार्याची माहिती चित्रे, लेखन आणि कलात्मक मांडणीच्या माध्यमातून भिंतीपत्रकावर साकारण्यात आली.
यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भिंतीपत्रकांची पाहणी करून त्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाचे आणि सर्जनशीलतेचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी हिंदी साहित्यिकांच्या जीवनकार्याचा सखोल अभ्यास करून माहिती प्रभावीपणे मांडल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन, संशोधन आणि सादरीकरण कौशल्य विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या अध्यक्षा डॉ. मीनल शेळके,मुख्याध्यापिका डॉ. प्रियंका देशमुख, प्री-प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा इंगळे तथा संचालक सुजित गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भिंतीपत्रकांविषयी मान्यवरांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांचा अभ्यास, सर्जनशीलता आणि सादरीकरण कौशल्य पाहून मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
या भिंतीपत्रक स्पर्धेचे परीक्षक मुकुल गवई , बाळासाहेब गोजरे आणि हर्षा सरकटे हे होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक साहित्यिकाची माहिती संकलित करून ती प्रभावीपणे सादर केली होती. त्यामुळे उपस्थितांना हिंदी साहित्याचा समृद्ध वारसा जाणून घेण्याची संधी मिळाली.
प्रदर्शनानंतर शाळेतील लहान विद्यार्थ्यांनीही या भिंतीपत्रकांचे उत्साहाने वाचन केले. या माध्यमातून त्यांना हिंदी भाषा, साहित्य आणि महान साहित्यिकांविषयी मौल्यवान ज्ञान प्राप्त झाले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, संशोधनाची वृत्ती आणि भाषेप्रती आदर निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.



