एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ!

ज्येष्ठ नागरिकव महिलांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी ;– शंकर शिवरकर
देऊळगाव राजा :एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय सामाईक गतिशीलता कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
१ ऑगस्टपासून हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार होते; मात्र अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप हे स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा दिलासादायक निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
सवलतींचा लाभ राहणार सुरूराज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना (७५ वर्षांवरील) मोफत प्रवास, ६५ ते ७५ वर्षांमधील ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यात ५०% सवलत देण्यात येते. या शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी महामंडळाने NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे.
मुदतवाढीमुळे आता तांत्रिक किंवा प्रशासकीय विलंबामुळे कोणताही पात्र प्रवासी या सवलतींपासून वंचित राहणार नाही, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.प्रक्रियेत गती आणण्याचे आवाहनकाही प्रवाशांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असली तरी त्यांना अद्याप कार्ड मिळालेले नाही.
त्यामुळे उर्वरित सर्व पात्र लाभार्थी आणि प्रवाशांनी १ सप्टेंबरपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करून NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महामंडळ आणि परिवहन मंत्र्यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्डमुळे एसटी प्रवासात कॅशलेस व्यवहार आणि जलद तिकीट प्रक्रिया सुलभ होणार आहे.
जादा दराने विक्री?
राज्यभरातील सर्वच बसडेपो आणि शहरात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तर, काही ठिकाणी हे कार्ड जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत.
ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.



