मुक्ताईनगरात जनावरांची तस्करी उघडकीस – शिवसेनेच्या कारवाईत कंटेनर पकडला

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – गणेश विसर्जनाच्या रात्रीचा फायदा घेत गुपचूपपणे कत्तलीसाठी जनावरे वाहतूक करणारा एक कंटेनर मुक्ताईनगरात पकडण्यात आला. ही कारवाई शिवसेना शहरप्रमुख गणेश टोंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसाने केली. शहरातून जात असलेल्या कंटेनरवर संशय आल्याने त्यांनी तत्काळ छापा टाकून तपासणी केली असता कंटेनरमध्ये म्हशींची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
शहरातून एका कंटेनरमधून जनावरांची वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती गणेश टोंगे यांना मिळाली होती. त्यांनी लगेचच आपल्या सहकाऱ्यांसोबत संशयित कंटेनर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हशी असल्याचे दिसून आले. या जनावरांना कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय असल्याने तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिसांची तात्काळ दखल
माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित कंटेनर ताब्यात घेत जनावरांची सुटका केली. सुटवलेल्या म्हशींना पुढील सुरक्षिततेसाठी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुरली येथील गोशाळेत हलविण्यात आले आहे.
कायदेशीर कारवाई सुरू
या प्रकरणी कंटेनर मालक व वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी वाहन जप्त केले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शहरात खळबळ, नागरिकांत संताप
या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जनावरांच्या अवैध तस्करीच्या प्रकारांबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून भविष्यात अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.
शिवसेनेच्या कारवाईचे कौतुक
शहरप्रमुख गणेश टोंगे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या तत्पर कारवाईमुळे अनेक निरपराध जनावरांचे जीव वाचले. त्यामुळे मुक्ताईनगरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे कौतुक केले आहे



