गुप्त पाहणीत उघडकीस आली सार्वजनिक वाहतुकीची वस्तुस्थिती; मंत्र्यांच्या अनुभवाने खळबळ

सुट्टे पैसे नसल्याने परिवहन मंत्र्यांनाच बसमधून उतरवले; चालक-कंडक्टर निलंबित
गुप्त पाहणीत उघडकीस आली सार्वजनिक वाहतुकीची वस्तुस्थिती; मंत्र्यांच्या अनुभवाने खळबळ
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | वृत्त संकलन
कर्नाटकातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी शनिवारी (११ जुलै) रात्री सर्वसामान्य प्रवाशाच्या वेशात गुप्तपणे बीएमटीसी बसने प्रवास केला. मात्र या पाहणीदरम्यान त्यांनाच धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. तिकीटासाठी सुट्टे पैसे नसल्याचे कारण देत बस कंडक्टरने त्यांना बसमधून उतरवण्यास सांगितल्याची घटना घडली.
मंत्री सुरेश यांनी चेहऱ्यावर मास्क लावून हेब्बल ते नागशेट्टीहळ्ळी या मार्गावरील बसमध्ये प्रवेश केला. त्यांनी दोन तिकिटांसाठी १०० रुपयांची नोट दिली. त्यावर कंडक्टरने सुट्ट्या पैशांची मागणी केली. आपल्या जवळ सुट्टे नसल्याचे मंत्री सांगताच कंडक्टरने त्यांना बसमधून उतरून जाण्यास सांगितले. त्यावेळी बसमधील कोणालाही ते परिवहन मंत्री असल्याची कल्पना नव्हती. मंत्रीही कोणताही वाद न घालता शांतपणे बसमधून खाली उतरले.
या घटनेनंतर संबंधित बस चालक आणि कंडक्टर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांना येणाऱ्या अडचणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
बस प्रवासानंतर मंत्री सुरेश यांनी नागशेट्टीहळ्ळी येथून रिक्षानेही प्रवास केला. मात्र तेथेही त्यांना वेगळाच अनुभव आला. रिक्षाच्या मीटरवर ३० रुपये भाडे दिसत असतानाही चालकाने ३६ रुपयांची मागणी केली. याबाबत विचारणा केल्यावर मीटरमध्ये बिघाड असल्याचे कारण सांगण्यात आले. अखेरीस मंत्री सुरेश यांनी ४० रुपये देऊन प्रवास पूर्ण केला.
दरम्यान, मंत्र्यांच्या या गुप्त पाहणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर अनेक नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीतील स्वतःचे अनुभवही सोशल मीडियावर मांडण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांशी होणाऱ्या अशा वागणुकीवर कठोर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



