महिलेची पर्स लंपास; आरोपी अटकेत

प्रतिनिधी. राजेंद्र मुंढे
शेगाव : दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची झोपेत असताना पर्स चोरणाऱ्या आरोपीला शेगाव रेल्वे पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. शरद भगवान शैरीसे (३५, रा. सैदपूर, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १३,५०० रुपये किमतीचा मोबाइल जप्त करण्यात आला.
सुरेखा किशोर मेशरे या १० जून रोजी भाविकांच्या गटासह शेगाव येथे आल्या होत्या. रात्री रेल्वे स्थानक परिसरात झोपेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लंपास केली. तक्रार मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक तेलंग यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित चोरटा पर्स चोरताना दिसून आला. आरोपीचा फोटो खबऱ्यांना पाठवून शोधमोहीम राबविण्यात आली. बुधवारी पहाटे आरोपी पुन्हा स्थानक परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बुकिंग हॉल परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली.



