महाबोधी चळवळीपासून आधुनिक विहारांपर्यंत : बौद्ध पुनर्जागरणाचा कोलकाता प्रवास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
कोलकाता, प्रतिनिधी : भारतातून १२व्या शतकानंतर जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापनेत कोलकाता शहराने ऐतिहासिक भूमिका बजावल्याचे विविध ऐतिहासिक नोंदींमधून स्पष्ट होते. पाल साम्राज्याच्या अस्तानंतर बंगालमधील बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला असला, तरी १९व्या शतकाच्या उत्तरार्धात याच शहरातून बौद्ध पुनर्जागरणाची नवी चळवळ सुरू झाली.पाल वंशीय राजांनी बंगालमध्ये बौद्ध धर्माचा व्यापक प्रचार-प्रसार केला होता. धर्मपाल यांसारख्या राजांनी नालंदा आदी विद्यापीठांचे संरक्षण केले तसेच बौद्ध साहित्याचे जतन केले. मात्र पाल साम्राज्याच्या पतनानंतर आणि सेन वंशाच्या उदयानंतर बौद्ध धर्माचा प्रभाव कमी होत गेला. पुढे मुस्लिम आक्रमणांनंतर हा ऱ्हास अधिकच वाढला.ब्रिटिश काळात भारताच्या प्राचीन इतिहासाचा शोध घेण्यास सुरुवात झाली. सन १७८४ मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना, त्यानंतरच्या पुरातत्त्वीय उत्खननांमुळे अनेक बौद्ध अवशेष प्रकाशात आले. सन १८६१ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची स्थापना झाल्यानंतर बौद्ध इतिहासाविषयीचे संशोधन अधिक वेगाने पुढे गेले.बोधगया येथील महाबोधी महाविहाराची दुरावस्था पाहून श्रीलंकेतील अनागरिक धम्मपाल यांनी १८९१ मध्ये बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी चळवळ सुरू केली. महंतांकडून विरोध व मारहाण झाल्यानंतर त्यांनी कोलकात्यात स्थायिक होत १८९३ मध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना केली. येथूनच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, बौद्ध साहित्याचा प्रचार आणि भारतातील प्राचीन बौद्ध स्थळांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य सुरू झाले.याच काळात महास्थविर चंद्रमणी यांनी कोलकात्यात बौद्ध धर्मप्रसाराचे कार्य सुरू केले. पुढे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा दिली. वेन. कृपाशरण महास्थविर यांनी १८९२ मध्ये बंगाल बुद्धिस्ट असोसिएशनची स्थापना करून बंगालमधील बौद्ध चळवळीला संघटित स्वरूप दिले. त्यांनी धर्मांकुर बुद्ध विहाराची उभारणी तसेच ‘जगज्योती’ मासिकाची सुरुवात केली.पाली भाषा आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अध्ययनालाही कोलकात्यात मोठी चालना मिळाली. धर्मानंद कोसंबी यांनी येथे पाली विषयाचे अध्यापन करून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर म्यानमार, तिबेट, जपान आणि इतर देशांतील भिक्षूंनी कोलकात्यात विविध बुद्ध विहार, मठ आणि सांस्कृतिक केंद्रे उभारली.आज कोलकाता शहरात महाबोधी सोसायटी, धर्मांकुर बुद्ध विहार, बर्मी बुद्ध विहार, ह्युयान स्यांग मठ, जपानी बौद्ध विहार तसेच फो ग्वान शान बुद्ध विहार यांसारखी अनेक महत्त्वाची बौद्ध केंद्रे कार्यरत आहेत. देश-विदेशातील बौद्ध अनुयायांसाठी ही स्थळे आकर्षणाचे केंद्र बनली आहेत.इतिहासकारांच्या मते, आधुनिक भारतातील बौद्ध धर्माच्या पुनर्जागरणाचा पाया कोलकात्यात रचला गेला. त्यामुळे बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापना आणि प्रसाराच्या इतिहासात कोलकात्याचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.



