गारपीट व वादळी वाऱ्याने केळी पिकांचे मोठे नुकसान; रक्षाताई खडसे यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी गुरुवारी रावेर तालुक्यातील विविध गावांना भेट देत नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.
खिरवड, निरूळ, अहिरवाडी, केऱ्हाळा, विवरा, कुंभारखेडा, सावदा आणि निंबोल या गावांमध्ये स्थानिक भाजप पदाधिकारी व शेतकऱ्यांसमवेत त्यांनी केळी पिकांच्या नुकसानीची तसेच वादळी वाऱ्यामुळे बाधित झालेल्या घरांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विमा कंपनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आवश्यक सूचना देण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी आणि विमा प्रतिनिधींशी त्वरित संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी तसेच पीक विमा योजनेबाबत उद्भवणाऱ्या शंका व समस्यांची माहिती अधिकाऱ्यांना सविस्तरपणे कळवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



